कडाक्याचे ऊन, तापलेले रस्ते यामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा देण्याकरीता शहराच्या मध्यभाग आणि सतत वर्दळीचा फरासखाना चौकात अनोखी संकल्पना राबविण्यात आली आहे. ती म्हणजे हजारो वाहनचालकांना भर उन्हात सावली मिळावी. यासाठी सिग्नलवर कापडी छत बांधण्यात आले आहेत. वाहनचालकांची अशा प्रकारे काळजी घेतल्याने पुणेकर नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख विश्वस्त आणि नगरसेवक हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात फरासखाना चौक, अप्पा बळवंत चौक, सिटी पोस्ट चौक येथील सात सिग्नलवर थांबणा-या वाहनचालकांसाठी कापडी छत तयार केलं आहे.

यावेळी हेमंत रासने म्हणाले की, मागील काही दिवसामध्ये शहराचे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जात असून सिग्नलकरीता चौकात उभ्या राहिलेल्या वाहनचालकांना उन्हाचा त्रास होत आहे.त्यामुळे कापडी छत सिग्नलच्या जवळ लावण्यात आले. आता येत्या काळात शहरातील विविध भागात कापडी छत लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या छताबाबत थोडक्यात माहिती :

फरासखाना चौकात 60 बाय 40 फूट आणि 50 बाय 30 फूट आकाराच्या हिरव्या कापडाचे छत, अप्पा बळवंत चौकामध्ये 30 बाय 20फूट, 20 बाय 20फूट आणि 40 बाय 20 फूट आकाराचे छत तसेच सिटी पोस्ट चौकामध्ये 60 बाय 30 फूट आणि 40 बाय 20 फूट आकाराचे छत लावण्यात आले आहे. प्रत्येकी तीन फूट रुंदीचे कापड शिवण्यात आले आहे. त्या माध्यमातुन मोठे छत तयार करण्यात आले आहे. तसेच 12 आणि 4 एमएम आकारच्या दो-यांचा वापर करुन हे छत बांधण्यात आले आहे.