पुण्यातील महात्मा फुले मंडई येथून मानाच्या पाच गणपतीची विसर्जन मिरवणुकीला सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली. आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भाविक रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठया संख्येने जमले आहे. तर याच विसर्जन मिरवणुकीत मानाच्या चौथा तुळशीबाग गणपतीमध्ये ॐ नमो परिवाराचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. या सर्वाकडून प्रत्येक व्यक्तीनं अवयवदान करावं, असं सांगत पत्रकं हाती घेऊन प्रबोधन केलं जात आहे.

पुण्यात विसर्जन मिरवणुकीमध्ये अनेक संस्था समाज प्रबोधनाचे काम करताना दिसत असून यामध्ये ॐ नमो परिवार ही संस्था सहभागी झाली आहे. ही संस्था सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या विषयी डॉ. वैशाली लोढा यांच्याशी संवाद साधला असता. त्या म्हणाल्या की, “ॐ नमो परिवार दरवर्षी विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होतो. प्रत्येक वेळी समाजातील घडामोडीवर आम्ही संदेश देण्याचे काम करतो. अनेक रुग्णालयात रुग्णांना अवयव हवे असतात. पण योग्य वेळी मिळत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये विशेष जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याने आम्ही प्रत्येक नागरिकाने अवयवदान करावे,” असे संदेश देत असल्याचे त्यांनी सांगितले.