18 September 2020

News Flash

संस्कृत नाटय़स्पर्धेतून पुणे झाले उणे

सांस्कृतिक राजधानीमध्ये होत असलेल्या संस्कृत नाटय़स्पर्धेमध्ये पुण्यातून एकाही संस्थेने सहभाग नोंदविलेला नाही, हेच या स्पर्धेचे वैशिष्टय़ आहे.

| February 18, 2014 02:55 am

भारताची सांस्कृतिक राजधानी असा पुण्याचा मोठय़ा अभिमानाने गौरव केला जातो. साहित्य, कला, संस्कृती याबरोबरच ‘संस्कृत’ या विषयामध्ये अग्रभागी असा लौकिक असलेले पुणे हौशी संस्कृत नाटय़स्पर्धेतून मात्र उणे झाले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ही नाटय़स्पर्धा घेतली जाते. यंदाची ५३ वी संस्कृत हौशी नाटय़स्पर्धा शुक्रवारपासून (२१ फेब्रुवारी) दोन दिवस भरत नाटय़ मंदिर येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातून आठ संघ पात्र ठरले आहेत. त्यामध्ये नागपूर आणि मुंबई येथील प्रत्येकी दोन संघ स्पर्धेत उतरले आहेत. अमरावती, नाशिक, रायगड आणि जळगाव येथील एका संघाचा समावेश आहे. मात्र, सांस्कृतिक राजधानीमध्ये होत असलेल्या या स्पर्धेमध्ये पुण्यातून एकाही संस्थेने सहभाग नोंदविलेला नाही, हेच या स्पर्धेचे वैशिष्टय़ आहे.
नागपूर येथील संस्कृत भाषा प्रचारिणी सभेतर्फे ‘चक्षुरुन्मिलितमं येन’ आणि रामनगर येथील महिला समाज संस्थेतर्फे ‘जोडयिता’ हे, तर मुंबईच्या माटुंगा येथील रामनारायण रुईया महाविद्यालयातर्फे ‘माधवीयम’ आणि मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघातर्फे ‘नृत्यकुटम’ हे नाटक सादर होणार आहे. अमरावती येथील गंधर्व बहुउद्देशीय संस्थेतर्फे ‘चाणक्य’, नााशिक येथील दीपक मंडळ सांस्कृतिक विभागातर्फे ‘उदकस्य उद्विगमन’, रायगडच्या पेण येथील अॅमॅच्युअर थिएटर संस्थेतर्फे ‘अंधायुगम्’ आणि जळगाव येथील ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटीतर्फे ‘ऋतुकलह’ ही नाटके सादर होणार आहेत. राज्याच्या विविध भागातून सहभाग घेणाऱ्या संस्थांची नाटके सादर होत असताना या स्पर्धेत पुणे मात्र उणे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून नाटय़ परिषदेच्या पुणे शाखेसह शहरातील विविध मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. संस्कृत नाटके सर्वाना पाहता यावीत यासाठी प्रवेशशुल्कदेखील आकारले जाणार नाही, अशी माहिती ‘मनोरंजन’ संस्थेचे मोहन कुलकर्णी यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2014 2:55 am

Web Title: pune team out from sanskrit drama competition
Next Stories
1 विशेष मुलांना हवा माणुसकीचा प्रत्यय- डॉ. नीलिमा देसाई
2 दाभोलकरांच्या डीव्हीडीचे बुधवारी प्रकाशन
3 भारती विद्यापीठातर्फे ‘रेझिलियन्स’ संपन्न
Just Now!
X