‘सॉफ्टवेअर’ अभियंता अंतरा दास खूनप्रकरणी देहूरोड पोलिसांनी  सॉफ्टवेअर अभियंता असलेल्या अंतराच्या मित्राला बुधवारी रात्री उशीरा अटक केली. तिची हत्या ही एकतर्फी प्रेम प्रकरणातून झाली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीच्या तीन साथीदारांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे.

[jwplayer OqkzNZNW]

संतोष कुमार अखिलेश प्रसाद गुप्ता असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. संतोष हा मूळचा बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील आराचा असून तो बंगळुरु मध्ये आयटी कंपनीत नोकरी करतो.  अंतरा बंगळुरू मध्ये ट्रेनिंगला असताना तिची संतोषशी ओळख झाली होती. त्यावेळी संतोषने तिला मदत केली होती. तो गेल्या ११ महिन्यापासून तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. तसेच तो अंतराकडे लग्न करण्याची मागणी करत होता. तिच्या मोबाईवलर संदेश पाठवून लग्न करण्याची मागणी करत होता. मात्र, अंतरा लग्न करण्यास तयार नव्हती.

अंतराने वेळोवेळी संतोषचा मोबाईल क्रमांक ‘ब्लॉक’ केला होता. तसेच अंतरा पुण्यात कोणासोबात फिरत आहे. तिच्यावर लक्ष ठेवण्याचे त्याने मित्रांना सांगितले होते,अंतरा ही तळवडे येथील कॅपजेमिनी या कंपनीत एप्रिलपासून नोकरी करत होती. नेहमी कंपनीची कॅब घेऊन जाणारी अंतरा रा. प्राधिकरण, निगडी, मूळगाव पश्चिम बंगाल शुक्रवारी दि.२३ रात्री तळवडे येथील केएनबी चौकातून पायी जात होती. त्यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञाताने तिच्या डोक्यावर आणि मानेवर धारदार हत्याराने वार केले आणि पसार झाला. अंतरा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्यावेळी तेथून जाणा-या सत्येंद्र यांनी तिला त्वरित उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारापूर्वीच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.

[jwplayer c8d0lrnd]