पुण्यात काही दिवसांपूर्वी दुचाकीच्या बॅटरीची चोरी केल्याच्या संशयावरून पेट्रोल ओतून पेटवलेल्या कचरावेचक मुलाच्या मृत्यूने आता जातीय वळण घेतले आहे. माझ्या मुलाने मी हिंदू आहे असे सांगितल्यानंतर त्याला पेटवून देण्यात आले, असा दावा या मुलाच्या वडिलांकडून करण्यात आला आहे. रूग्णालयात मृत्यूशय्येवर असताना त्याच्या या जबाबाची ध्वनिचित्रफीत तयार केल्याचा दावाही मुलाच्या वडिलांकडून करण्यात आला आहे. मी माझ्या कुटुंबाबरोबर पंढरपूरमध्ये काम करत होतो. त्यांच्याशी वाद झाल्यानंतर मी पुण्यात काम शोधण्यासाठी आलो. एके ठिकाणी मी लघुशंका करत असताना तीनजण माझ्यापाशी आले आणि त्यांनी मला माझे नाव विचारले. मी सावन राठोड असे सांगितल्यानंतर त्यांनी मी हिंदू आहे का, असे विचारले, मी हो म्हणालो. त्यानंतर या तिघांनी कॅनमधून माझ्या अंगावर काहीतरी ओतले आणि मला पेटवून दिले, असे या ध्वनिचित्रफीतमध्ये सावनने म्हटले आहे.
१३ जानेवारी रोजी कसबा पेठतील पवळे चौक परिसरात सावन राठोड याला पेट्रोल ओतून पेटवून देण्यात आले होते. त्यानंतर ससून रूग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी इब्राहिम मेहबूब शेख (वय ३५), इम्रान शेख (वय २८) आणि जुबेर तांबोळी (वय २६ तिघेही रा. कसबा पेठ) यांना १४ जानेवारी रोजी फरासखाना पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी तिघा आरोपींविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, सावन राठोड याचा ज्याप्रकारे खून करण्यात आला ती पद्धत इसिस या दहशतवादी संघटनेच्या पद्धतीशी मिळतीजुळती असल्याचा आरोप शहरातील हिंदुत्त्ववादी संघटनांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) करण्याची मागणीही या संघटनांनी केली आहे. राठोड बंजारा समाज आणि हिंदुत्त्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी याप्रकरणी पोलिसांची भेट घेऊन येत्या २७ तारखेपासून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी सावनचा कबुलीजबाब असलेली सीडीदेखील पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आली.