येत्या तीन दिवसांत पावसाची शक्यता
दुपारी तापणारे ऊन दिवसेंदिवस अधिकच जाणवू लागले असून, पुण्यात मंगळवारी दिवसाचे तापमान ४१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. गेल्या तीन वर्षांत मे महिन्यात पहिल्यांदाच तापमानाने ४१ अंशांची पातळी गाठली आहे. त्यातच सध्या हवामान ढगाळ असून, गुरुवारपासून (५ मे) पुढे तीन दिवस पुणे आणि परिसरात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यताही वेधशाळेने वर्तवली आहे.
एप्रिल महिन्यात एकूण ११ दिवस पुण्याचे कमाल तापमान ४० अंश वा त्याहून अधिक राहिले. एप्रिलच्या मध्यावर सलग दोन दिवस ४०.८ अंश, तर शेवटचे दोन दिवस ४०.५ अंश तापमानाने उकाडा असह्य़ केला. मे महिन्यात यापूर्वी २०१३ मध्ये कमाल तापमान ४१.३ अंश झाले होते, त्यानंतर यंदाच्या मे मध्येच ते इतके वाढल्याचे दिसून येत आहे. बुधवारपासून शुक्रवापर्यंत मात्र दिवसाचे तापमान १ ते २ अंशांनी कमी होण्याची शक्यता आहे. सध्या वातावरण ढगाळ आहे. ५ मे ते ७ मे या कालावधीत शहर व परिसरात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली असून, त्यानंतर हवामान ढगाळ राहू शकेल.