आठवडाभरात चाळीशी गाठण्याची शक्यता

अजूनही तुम्ही डोक्यावर टोपी किंवा स्कार्फ, सनकोट, बरोबर पाण्याची बाटली असा जामानिमा घेतल्याशिवाय घराबाहेर पडत असाल तर थांबा! गेले दोन आठवडे किंचित कमी झालेले दिवसाचे तापमान, सकाळी वाजणारी थंडी आणि अधूनमधून ढगाळ हवा, यामुळे उन्हाचा ताप कमी जाणवला असेल, तर ती स्थिती आता पालटणार आहे. या आठवडय़ात दिवसाचे तापमान हळूहळू वाढत जाणार असून तापमानाची चाळिशी गाठण्याकडे पाऱ्याची वाटचाल सुरू होणार आहे.

सोमवारी पुण्यात ३५.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली, तर लोहगावला ३६.९ अंश तापमान नोंदले गेले. ‘भारतीय हवामानशास्त्र विभागा’ने या आठवडय़ासाठी नोंदवलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार मंगळवारपासून कमाल तापमानात दररोज वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारी पुण्याचे कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस राहू शकेल आणि शनिवापर्यंत ते ३९ अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानही वाढणार आहे. सोमवारी पुण्याचे किमान तापमान १५ अंशांवर होते. आठवडय़ाच्या शेवटी मात्र ते १८ अंशांपर्यंत जाईल. त्यामुळे आता उन्हाळ्याची तीव्रता वाढणार आहे. सध्या हवा ढगाळ नाही, परंतु शनिवार-रविवारच्या सुमारास हवामान अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

राज्यात सोमवारी सर्वाधिक कमाल तापमान सांगली येथे (३७.६ अंश सेल्सिअस) होते, तर सर्वात कमी किमान तापमान पुण्यातच (१५ अंश) नोंदवले गेले. सांगलीच्या खालोखाल सोलापूर (३७.२ अंश), लोहगाव, कोल्हापूर, सातारा, जळगाव, अकोला आणि चंद्रपूर येथे दिवसाचे तापमान ३६ अंश वा त्याहून अधिकच राहिले.