News Flash

पुणे – करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांकडून सुधारित आदेश जारी

पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध

संग्रहीत

करोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंध व नियंत्रणाबाबत पुणे शहरासाठी सुधारित आदेश काढण्यात आले आहेत. पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी हे आदेश काढले आहेत.

नवीन आदेशानुसार पुणे महानगरपालिका क्षेत्रात सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते सायंकाळी ६ यावेळेत पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध असणार असून, कलम १४४(जमावबंदी) लागू करण्यात येत आहे. याचबरोबर, पुणे महानगरपालिका क्षेत्रात सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ६ ते सकाळी ७ या कालावधीत तसेच शुक्रवार सायंकाळी ६ ते सोमवार सकाळी ७ वाजेपर्यंत अत्यावश्यक कारण/ अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास संपूर्णत: प्रतिबंध(संचारबंदी) करण्यात येत आहे.

अत्यावश्यक सेवांमध्ये रूग्णालयं, डायग्नोस्टिक सेंटर, क्लिनिक, वैद्यकीय विमा कार्यालय, फार्मसीज व फार्मासिटीकल कंपनी, इतर वैद्यकीय व आरोग्य सेवा, किराणा, भाजीपाला, डेअरी, बेकरी, मिठाई व खाद्यपदार्थांची दुकाने, सार्वजनिक वाहतूक – सार्वजनिक बस, टॅक्सी, रिक्षा, रेल्वे, पूर्व पावसाळी नियोजित कामे, स्थानिक प्राधिकरणाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या सार्वजनिक सेवा, मालवाहतूक, कृषी संबंधित सेवा, ई- कॉमर्स, मान्यताप्राप्त मीडिया, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे घोषित केलेल्या अत्यावश्यक सेवा यांचा समावेश असणार आहे.

तसेच, पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व उद्याने, सार्वजनिक मैदाने सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ६ ते सकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. तसेच, शुक्रवारी सायंकाळी ६ ते सोमवार सकाळी ७ वाजेपर्यंत या कालावधीत संपूर्णत: बंद राहतील. नागरिकांनी सदर ठिकाणी वावरताना समाजिक अंतर व स्वच्छता बाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असणार आहे. पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व प्रकारची दुकाने, मार्केट व मॉल (अत्यावश्यक सेवा वगळून) संपूर्णत: बंद राहणार आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. हे नियम १० एप्रिल २०२१ पासून लागू करण्यात येणार आहेत. पुणे महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (पीएमपीएमएल) अत्यावश्यक सेवा वगळून ९ एप्रिल २०२१ पर्यंत संपूर्णत: बंद राहणार आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट बंद असणार आहेत. पार्सल सेवा व घरपोच सेवा सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत सुरू राहणार आहे. याशिवाय सर्व धार्मिकस्थळ बंद राहणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 9:05 pm

Web Title: pune the municipal commissioner has issued a revised order because increasing contagion of corona msr 87 svk 88
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पुण्यात राहून पोलीस होण्याचं स्वप्न अपूर्णच; करोनामुळे शेतकरी कुटुंबातील तरुणाचा मृत्यू
2 “खूप गरम होतंय, मास्क नाही घालू शकत…”, असं म्हणणाऱ्यांसाठी पुणे पोलिसांचा खास Video
3 दुर्मीळ आजारांबाबत केंद्र सरकारचे धोरण नावापुरतेच
Just Now!
X