वाहतूक पोलीस शाखेचा इशारा; बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतुकीला अडथळा

सम-विषम दिनांक न पाहता बेशिस्त वाहनचालकांकडून रस्त्यात लावलेल्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा होतो. बेशिस्तपणे लावलेल्या वाहनांच्या चाकांना पोलिसांकडून जॅमर लावले जातात. काही वाहनचालक चाकांना लावलेले जॅमर तोडून पसार होतात. जॅमर चोरी म्हणजे गुन्हा असल्याची जाणीव अनेक वाहनचालकांना नसते. त्यामुळे ‘जॅमरचोरां’विरुद्ध कडक कारवाईचा इशारा वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांनी दिला आहे.

बेशिस्त वाहनचालकांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते. काही वाहनचालक रस्त्याच्या मधोमध वाहने लावतात, त्यामुळे कोंडी होती. पादचाऱ्यांना चालणे देखील अवघड होते. अशा वाहनचालकांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते. वाहनांच्या चाकांना जॅमर लावले जातात. मात्र, काही वाहनचालक चाकांना लावलेले जॅमर तोडतात आणि जॅमर बरोबर घेऊन जातात. रस्त्यात तुटलेला जॅमर टाकून पसार होतात. जॅमर तोडून पळून जाणे हा गुन्हा आहे, याची जाणीव अनेक वाहनचालकांना नसते. जॅमर चोरल्यानंतर पोलिसांकडून भादंवि ३७९ अनुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येतो. वाहतूक पोलिसांकडे पंधराशे जॅमर आहेत. जॅमर तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त मोराळे यांनी सांगितले.

पुण्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनचालकांकडून सर्रास नियमभंग केला जातो. बेशिस्त वाहनचालकांविरूद्ध वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. गेल्या काही वर्षांत चारचाकी वाहनांची संख्या शहरात वाढली आहे. ट्रक, मोटार अशा वाहनांच्या चालकांकडून सर्रास जॅमर तोडले जातात. त्या तुलनेत दुचाकीस्वारांकडून जॅमर तोडण्याचे प्रमाण कमी आहे. सम-विषम दिनांक न पाहता रस्त्यात लावलेल्या दुचाकींवर कारवाई करण्यात येते. अशी वाहने टेम्पोतून वाहतूक विभागाच्या कार्यालयात आणली जातात. मात्र, मोटारी, ट्रक अशी जड वाहने उचलून नेणे शक्य नसते. त्यामुळे चारचाकी वाहनांच्या चाकांना जॅमर लावून कारवाई केली जाते. शहरातील रस्ते अरुंद आहेत. अरुंद रस्त्यावर वाहने लावल्यामुळे कोंडी होते, असे त्यांनी सांगितले.

जॅमर चोरल्याप्रकरणी एकाला शिक्षा

मुंबई-बंगळुरु बाह्य़वळण मार्गावर नऱ्हे भागात एका ट्रकचालकाने सेवा रस्त्यावर २२ जून २०१६ रोजी ट्रक लावला होता. पोलिसांकडून ट्रकच्या चाकाला जॅमर लावण्यात आला होता. ट्रकचालक संतोष लक्ष्मण तेलंगे (रा. केळवडे, ता. भोर) जॅमर तोडून पसार झाला. गेल्या आठवडय़ात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. बी. गुळवे-पाटील यांनी ट्रकचालक तेलंगे याला जॅमरचोरीच्या गुन्ह्य़ात दोषी ठरवले आणि त्याला न्यायालयाचे कामकाज संपेपर्यंतची शिक्षा सुनावली.