नियम मोडून इच्छितस्थळी पोहोचताना अवघी चार मिनिटे वाचली

वाहन चालवतानाची बेशिस्त, वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली यामुळे शहरात वाहतूककोंडी होत असल्याचे निरीक्षण वाहतूक पोलिसांकडून नोंदविण्यात आले आहे. हे सिद्ध करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी एक प्रयोगही केला. वाहतुकीचे नियम पाळणारा वाहनचालक आणि वाहतुकीचे नियम मोडून जाणारा वाहनचालक यांना इच्छित स्थळी पोहोचण्यास जो वेळ लागतो त्यात या प्रयोगामध्ये फक्त चार मिनिटांचा फरक पडला.

या प्रयोगात पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेतील चार पोलीस साध्या वेशात सहभागी झाले होते. या प्रयोगासाठी कात्रज चौकातील मंडई ते वेधशाळा चौक असे १०.१ किलोमीटरचे अंतर निश्चित करण्यात आले होते. या मार्गावर १३ ठिकाणी वाहतूक नियंत्रक दिवे (सिग्नल) आहेत. साध्या वेशातील दुचाकीस्वार पोलीस सकाळी साडेदहा वाजता कात्रज येथून निघाले. त्यापैकी एका पोलिसाने वाहतुकीच्या नियमांचे पालन केले. त्याने प्रवासात दुचाकीचा हॉर्न वाजविला नाही. तर, या प्रयोगात सहभागी झालेल्या दुसऱ्या दुचाकीस्वार पोलिसाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले. कात्रज ते वेधशाळा चौक या दरम्यानचे अंतर नियम मोडणाऱ्या वाहतूक पोलिसाने २४ मिनिटांत पार पाडले आणि ज्या पोलिसाने नियम मोडले नाहीत, त्याला हे अंतर कापण्यास २८ मिनिटे लागली. नियम मोडणारा चार मिनिटे लवकर पोहोचला, पण त्याने स्वत:चा जीव धोक्यात घातला, तसेच वाहतुकीच्या नियमांचा भंग करत वाहन चालवले, असा निष्कर्ष या प्रयोगातून नोंदविण्यात आला.

पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच हा प्रयोग राबविण्यात आला. वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते, दत्तवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले, संपतराव भोसले, ढगे यांच्या सूचनेनुसार वाहतूक शाखेतील पोलीस शिपाई बाठे, शिंदे, गिरमे, चौधरी त्यात सहभागी झाले होते. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, असे आवाहन पोलिसांकडून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र बेशिस्तीने वाहन चालवणारे चालक ठिकठिकाणी दिसत आहेत. वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे वेळ वाचतो असा जो समज आहे तो चुकीचा असल्याचे या प्रयोगातून पोलिसांनी निदर्शनास आणले आहे. वाहनचालकाने नियम मोडले तर तो अवघी काही मिनिटे लवकर इच्छित स्थळी पोहोचतो. नियम मोडणारा जीव धोक्यात घालतो. नियम पाळणाऱ्या चालकाला फक्त काही मिनिटांचाच उशीर होतो.

नियमांना बगल

* वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन

* वाहतूक नियंत्रक दिवे झुगारण्याची मनोवृत्ती

* पादचारी मार्गावर वाहने उभी करण्याची हौस

* विनाकारण हॉर्न वाजविण्याची मानसिकता

* नियम मोडून दंड भरून सुटण्याची वृत्ती