27 May 2020

News Flash

वाहतूक पोलिसांकडून अमानोराला नोटीस

विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांना रोखण्यासाठी टायर किलर बसविण्यात आले.

हडपसर भागातील ‘टायर किलर’ वाहतूक पोलिसांनी हटवले.

वादग्रस्त ‘टायर किलर’ हटवले; बेशिस्त वाहनचालकांना प्रोत्साहन!

विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांना रोखण्यासाठी हडपसर भागातील अमानोरा पार्क टाऊ नशिपच्या आवारात बसवण्यात आलेले ‘टायर किलर’ वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सुरुवातीला या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले होते, मात्र अणकुचीदार खिळे असलेल्या टायर किलरला वाहतूक पोलिसांनी आक्षेप घेतला आहे. टायर किलरमुळे अपघात होण्याची शक्यता आहे, अशा तक्रारी वाहतूक पोलिसांकडे करण्यात आल्यानंतर वाहतूक पोलिसांकडून तातडीने अमानोरा टाऊनशिपला टायर किलर काढून टाकण्याची नोटीस बजावली आहे. दरम्यान, सोमवारपासून टायर किलर काढण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांचा आदेश म्हणजे बेशिस्त वाहनचालकांना प्रोत्साहन देण्यासारखे असल्याची टीका अमानोरा टाऊनशिपकडून करण्यात आली आहे.

अमानोरा टाऊनशिप या निवासी संकुलातील फ्युचर टॉवर परिसरात तीन दिवसांपूर्वी टायर किलर बसविण्यात आले. या परिसरात शाळा आहे. विरुद्ध दिशेने अनेक वाहनचालक येतात. त्यामुळे तेथे अपघात होण्याची शक्यता होती. त्यामुळे तेथे टायर किलर हे तंत्रज्ञानावर आधारित गतिरोधक बसविण्यात आले. अणकुचीदार खिळे असलेल्या टायर किलरवरून विरुद्ध दिशेने येणारा वाहनचालक गेल्यास दुचाकी किंवा चारचाकी वाहनांच्या चाकांना छिद्र पडते. टायर पंक्चर होतो. अशा प्रकारचे तंत्रज्ञान परदेशात वापरले जाते. त्यामुळे सुरुवातीला टायर किलरचे कौतुक  करण्यात आले होते. या बाबतची चित्रफीत समाजमाध्यमातून प्रसारित करण्यात आली होती.

या बाबत अमानोरा टाऊनशिपचे उपाध्यक्ष सुनील तरटे ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले, अमानोरा टाऊनशिपमधील फ्युचर टॉवर परिसरात शाळा आहे. तेथे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांना रोखण्यासाठी टायर किलर बसविण्यात आले. अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर देशात पहिल्यांदा सोसायटीच्या आवारातील रस्त्यांवर करण्यात आला. टायर किलर बसविल्यानंतर पोलिसांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि काही तासांनंतर काढून टाकण्याची नोटीस बजावली. एकप्रकारे ही नोटीस म्हणजे बेशिस्त वाहनचालकांना प्रोत्साहन देण्याचा प्रकार आहे.

या बाबत हडपसर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर म्हणाले, फ्युचर टॉवर परिसरात दहा ते पंधरा हजार रहिवासी राहतात. मुळात टायर किलर बसविण्याबाबतची परवानगी अमानोरा टाऊनशिपकडून घेण्यात आली नव्हती. विनापरवाना टायर किलर बसविण्यात आल्यामुळे वाहतूक पोलिसांनी टायर किलरला नोटीस बजावली आहे. टायर किलर तत्काळ काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टायर किलर काढण्याची कारणे

टायर किलर सार्वजनिक वापराच्या रस्त्यावर बसविण्यात येत नाहीत. लष्कराच्या काही संस्था तसेच प्रतिबंधात्मक क्षेत्रात टायर किलर बसविले जातात. पुण्यात एका लष्करी संस्थेच्या आवारात टायर किलर आहेत. इंडियन रोड काँग्रेसने टायर किलर बसविण्याबाबत काही निर्देश दिले आहेत. सार्वजनिक वापराच्या रस्त्यांवर टायर किलर बसवणे योग्य नाही, असे हडपसर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी  सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2018 2:31 am

Web Title: pune traffic police issue notice to remove amanora tyre killer
Next Stories
1 डासांच्या त्रासामुळे सांगवीकर हैराण
2 रिक्षाचालकांचा गणवेश, बिल्ला पुन्हा गायब!
3 उत्पन्नवाढीसाठी रस्ते खोदाईवर अधिभार
Just Now!
X