वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकीला तीन वर्षांनंतर मुहूर्त सापडला. पोलीस आयुक्तालयात बुधवारी पार पडलेल्या बैठकीत वाहतूक सल्लागार समितीच्या सदस्यांनी शहरातील वाहतुकीच्या समस्या थेट पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यापुढे मांडल्या. पदपथांवर झालेले अतिक्रमण, वाहतुकीची कोंडी, वाहतूक पोलिसांकडून मिळणारी वागणूक अशा तक्रारी सदस्यांनी यावेळी केल्या.

शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी वाहतूक सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली आहे. गेले तीन वर्ष या समितीची बैठक पार पडली नव्हती. त्यामुळे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पुढाकार घेऊन वाहतूक समितीच्या सदस्यांची बैठक बुधवारी पोलीस आयुक्तालयात आयोजित केली होती. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे याप्रसंगी उपस्थित होते. महापालिका आणि प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी पोलीस आयुक्त शुक्ला म्हणाल्या की, गेले तीन वर्ष वाहतूक समितीची बैठक आयोजित करण्यात आली नव्हती. यापूर्वी बैठक आयोजित करण्यात का आली नाही, याची कारणमीमांसा करण्यापेक्षा आगामी काळात वाहतुकीच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वानी प्रयत्न करण्याची गरज आहे. वाहतूक समितीच्या सदस्यांनी केलेल्या सूचनांचा विचार करण्यात येईल.

शहरातील अनेक भागांत पदपथांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. हे अतिक्रमण तातडीने हटविण्यासाठी महापालिकेने तातडीने मोहीम सुरू करावी. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या पोलिसांवरदेखील कारवाई करण्यात यावी. शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात होणारी कोंडी सोडविण्यासाठी शाळेतील कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात यावी, अशी सूचना वाहतूक समितीचे सदस्य अ‍ॅड. राहुल पाटील यांनी केली.

दरम्यान ऑगस्ट महिन्यात पुन्हा वाहतूक समितीची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. वाहतूक समितीच्या सदस्यांनी केलेल्या सूचना विचारात घेऊन कारवाई करण्यात येणार आहे. तसेच वाहतूक नियमनांसाठी स्वयंसेवकांची मदत घेण्यात येणार आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन आणि हेल्मेट वापरासंदर्भात प्रबोधन करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.