News Flash

बाजारभेट : महिलांच्या जिव्हाळय़ाची ऐतिहासिक बाजारपेठ!

गावोगावी आता अशा बाजारपेठेला तुळशीबाग म्हणूनच संबोधले जाते.

पुण्यनगरीतील ऐतिहासिक मंदिरांचा वेध घेतला तर तुळशीबागेच्या राममंदिराचे नाव निश्चितच अग्रभागी येते. हे मंदिर आणि त्याचा अंतर्गत परिसर म्हणजे पेशवाईकाळातील अजोड वास्तुकलेचा नमुना आहे. या वैशिष्टय़ाबरोबरच तुळशीबाग ही मुख्यत्वे येथील बाजारपेठेमुळेच सर्वदूर प्रसिद्ध आहे. मंदिराच्या अंतर्गत आणि बाहेरील परिसरात स्वाभाविकपणे जी बाजारपेठ काळाच्या ओघात विकसित होत गेली त्याचेच अत्याधुनिक स्वरूप म्हणजे सध्याची तुळशीबाग! मुख्यत्वे महिलांसाठी आवश्यक अशा वस्तूंची, प्रापंचिक साहित्याची, पूजासाधनांची, सौंदर्यसाधनांची, महिला तसेच बालकांच्या कपडय़ांची बाजारपेठ म्हणून मुख्यत्वे हा परिसर प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक वारशामुळेही बाजारपेठ आता वाक्प्रचार झाली आहे. गावोगावी आता अशा बाजारपेठेला तुळशीबाग म्हणूनच संबोधले जाते.

तुळशीबाग बाजारपेठेच्या चतु:सीमा जाणून घेतल्या, की येथील बाजारपेठेची विविधता आणि घनता आपल्या लक्षात येते. लक्ष्मी रस्त्यावरील झांजले विठ्ठल मंदिरापासून, खाली सिटी पोस्ट चौक, उजवीकडे टिळक पुतळा रस्ता, श्रीनाथ टॉकीज मार्गे शनिपार आणि परत कुंटे चौकाकडे, अशी ढोबळमानाने तुळशीबाग बाजारपेठ मानली जाते. या परिसरात सुमारे चारशे पथारी व्यावसायिक आणि तीनशे दुकाने आहेत. दुसऱ्या अर्थाने असे म्हणता येईल, की किमान चार हजार कुटुंबांचा चरितार्थ या बाजारपेठेवर चालतो आणि त्यातील सत्तर टक्के मंडळी अल्प उत्पन्न गटातील आहेत. या भागात तीन पिढय़ा व्यवसाय करणारे बरेच जण आहेत. जे पूर्वी रस्त्यावर व्यवसाय करीत होते, आता त्यांची स्वत:ची दुकाने असून, नातवंडे उच्चशिक्षित आहेत. या सर्व मंडळींची तुळशीबागेतील प्रभू रामचंद्रांवर आणि मंडळाच्या भव्य गणरायांवर नितांत श्रद्धा आहे.

बाजारपेठेतील व्यवसायांच्या तपशिलात जाण्यापूर्वी या परिसराचा इतिहास जाणून घेणे उचित ठरेल. शिवकाळात पुण्याच्या सीमा कसबा पेठेपर्यंत सीमित असताना सध्याच्या तुळशीबाग, मंडई परिसरात सरदार खाजगीवाले यांच्या मालकीची शेतजमीन होती. हा सर्व परिसर, काळे वावर म्हणून सुपरिचित होता. पेशव्यांचे सरदार नारोअप्पाजी तुळशीबागवाले यांनी १७६१ साली तुळशीबाग मंदिराची स्थापना केली. मंदिरात मुख्यत्वे राजघराण्यातील स्त्रिया आणि त्यांचा परिवार यांची वर्दळ असल्याने सुरुवातीच्या काळात मंदिराच्या आवारात आणि प्रवेशद्वार परिसरात पूजासाहित्याची आणि किरकोळ सौंदर्यप्रसाधनांची छोटी दुकाने सुरू झाली. कालांतराने याच वस्तूंच्या व्यापाराचा विस्तार होऊन त्याला आजच्या बाजारपेठेचे स्वरूप आले, असे मानले जाते.

बाजारपेठेत सद्य:स्थितीत जशा अत्याधुनिक इमारती उभ्या आहेत. त्याचबरोबर काही जुन्या वास्तूदेखील जिव्हाळय़ाने जपलेल्या दिसतात. विश्रामबाग समोरील भिडे वाडा, काकाकुवा मॅन्शन, झांजले विठ्ठल मंदिर, दगडूशेठ दत्तमंदिर, दक्षिणमुखी मारुती अशी काही उदाहरणे सांगता येतील. मिठाईचे दुकान बंद करून तिथे मठ स्थापन केल्याचा प्रकार बदलत्या जनमानसाचे द्योतक वाटतो. जिलब्या मारुती मंदिराजवळ असलेले सतीचे स्थान म्हणजे या परिसरात पूर्वी स्मशानभूमी असल्याचा पुरावा मानला जातो. पूर्वी येथूनच वाहणारा ओढा तांबडी जोगेश्वरी मंदिर मार्गे पुढे मुळा-मुठा नदीला मिळाला होता हे वास्तव आहे.

तुळशीबागेतील काही वैशिष्टय़पूर्ण व्यावसायिकांचा उल्लेख इथे अपरिहार्य ठरतो. काष्टौषधींचे तीन व्यावसायिक, गोकुळदास गोवर्धनदास, अंबादास, वनौषधालय आणि सहय़ाद्री औषधी भांडार, स्मृतिचिन्हांच्या व्यवसायाचे पाईक देवरुखकर, नगरकर सराफ, केळकर चित्रशाळा आणि तेथील जुने लाकडी चरकाचे गुऱ्हाळ (आता नाही) वाद्यविक्री आणि दुरुस्ती करणारे मिरजकर, घोडके पेढेवाले, पोरवाल सायकल इ. ग्राहक, दुकानदार आणि खवय्या पुणेकरांचे आकर्षण असलेली श्रीकृष्ण मिसळ, कावरे आइस्क्रीम, शंकरराव वडेवाले, पुण्यातील पहिले पावभाजी व्यावसायिक रौनक, दमदार चहा-नाश्त्यासाठी स्वरूप, अक्षय आणि अगत्य ही हॉटेल्स तुळशीबागेचे खाद्यवैशिष्टय़ आहेत.

तुळशीबागेच्या बाजारपेठेची विभागणी मंदिराच्या आवारातील आणि बाहेरील परिसर अशी केली तर मुख्यत्वे मंदिरात धातूची भांडी, देवांच्या मूर्ती आणि दागिने, पूजासाहित्याची दुकाने आहेत. बाहेरील परिसरात कपडे, प्लॅस्टिकच्या वस्तू, चप्पल, पर्स, खेळणी, सौंदर्यप्रसाधने, इमिटेशन ज्वेलरीपासून पाय पुसण्यांपर्यंत सर्व व्यावसायिक येथे दिसतात. बाजारपेठेचे कोटय़वधीचे अर्थकारण लक्षात घेता, व्यावसायिकांच्या संघटना कार्यरत असणे हे स्वाभाविक आहे. सर्वपक्षीय राजकीय पक्षांना ‘सामावून’ घेण्याचे कौशल्यसुद्धा इथे लक्षात येते. छोटे व्यावसायिक असोसिएशन, स्टेशनरी, कटलरी जनरल र्मचट असोसिएशन, तुळशीबाग परिसर, व्यापारी संघटना यांचे बहुसंख्य सदस्य येथील व्यापारी मंडळी आहेत. सावकार मंडळींच्या जाचातून सुटका करण्यासाठी तुळशीबाग नागरी पतसंस्था सक्रिय आहे. बाबू गेनू, तुळशीबाग आणि जिलब्या मारुती मंडळाचे अर्थकारण मुख्यत्वे येथील व्यापारावरच आहे.

तुळशीबागेत पूर्वी रस्त्यावर पथारी टाकून निष्ठेने व्यवहार करून, कालांतराने स्वत:च्या मालकीचे दुकान घेणारे काही जण, आता त्यांची पुढील पिढी उच्च शिक्षणासाठी परदेशातसुद्धा गेले आहेत. शकुंतला तांदळे, सूरतवाला भाभी, गजानन शालगर, सुंदराबाई रामलिंग, चंद्रकांत ठक्कर, इंदुमती पंडित, पांडुरंग देशमुख, महादेव शालगर, सूरजमल अग्रवाल, अशी प्रातिनिधिक नावे यासंदर्भात घेता येतील. किशोर दाभाडे यांचा उल्लेख अपरिहार्य आहे. व्यापाऱ्यांच्या संघटना आणि मंडळांतर्फे उत्पन्नातील काही भाग, उपेक्षितांच्या संस्थांसाठी आस्थेने व्यतीत केला जातो.

पुणे शहराचा केंद्रबिंदू असलेला, लोकवस्ती आणि व्यापाराने गजबजलेला हा परिसर, गुणवैशिष्टय़ांबरोबर काही समस्यांनीसुद्धा ग्रासलेला आहे. निवासी मंडळींचा कोंडमारा, वाहतुकीची वारंवार उद्भवणारी समस्या, अतिक्रमण खात्याची केवळ कागदोपत्री दिसणारी कारवाई, कोणतेही पुरावे नसलेली हप्तेबाजी, अशा अनेक बाबी सर्वज्ञात असूनही वाच्यता न होता, जगा आणि जगू द्या- या तथाकथित विचाराने सर्व व्यवहार चालू राहतात. या भागातील पथारीचे मासिक भाडे आणि दुकानाच्या जागेचा स्क्वेअर फुटाचा भाव पुण्यामध्ये सर्वोच्च आहे एवढी माहिती खूप काही सांगणारी ठरते.

तुळशीबागेच्या बाजारपेठेबाबत संक्षिप्तपणे सांगायचे झाल्यास ऐतिहासिक वारसा जपताना परंपरेची कास धरून इथे परिवर्तनालासुद्धा साथ दिसते. समस्यांवर मात करून इथे जगण्याची धडपड आहे. छुप्या गुंडागर्दीसह इथे माणुसकीचे झरेसुद्धा आहेत. विशेष म्हणजे महिलांसाठी, कौटुंबिक जिव्हाळय़ाची बाजारपेठ हे वैशिष्टय़ स्थापनेपासून आजतागायत जपलेले आहे, हेच महत्त्वाचे वाटते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 3:04 am

Web Title: pune tulsi baug market
Next Stories
1 दहावीनंतर लाखो विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर!
2 पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक पदासाठी संयुक्त पूर्वपरीक्षा
3 ना सेलिब्रेटी, ना पुढारी रांगेत
Just Now!
X