News Flash

पुणे : Ola बुक करुन ड्रायव्हरचा खून, कार चोरीला

त्या दोघांनी ओला ड्रायव्हरचा खून करुन कार पळवली पण कॅबला जीपीएस यंत्रणा असल्यामुळे...

(सांकेतिक छायाचित्र)

पुण्यात कॅब सुविधा पुरवणाऱ्या ओला चालकाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन व्यक्तींनी ओला कॅब बूक करुन ड्रायव्हरचा गळा आवळून खून केला आणि नंतर कारसह गुजरातमध्ये पळ काढला. कात्रज -कोंढवा रोडवरील केसर लॉजच्या मागील एका मोकळ्या मैदानात शनिवारी सकाळी चालकाचा मृतदेह आढळल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील रघुनाथ शास्त्री(वय-52) असं मृत ओला कॅबचालकाचं नाव आहे. शास्त्री हे लोहेगाव येथील पठारे वस्तीमध्ये रहायला होते. मैदानात सकाळी फिरायला आलेल्या नागरीकांना एक मृतदेह पडला आढळला त्यानंतर त्यांनी कोंढवा पोलिसांना याची माहिती दिली. दुपारी तो मृतदेह ओला कॅबचालकाचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या गाडीचा शोध घेण्यास सुरुवात केली. शास्त्री यांच्या कॅबला जीपीएस यंत्रणा होती. संशयितांनी शास्त्री यांचा गळा आवळून खून केल्यानंतर मृतदेह तेथेच टाकला व गाडी पळवून नेली होती, पण त्यावरील जीपीएस यंत्रणा सुरु होती. पोलिसांनी त्याद्वारे शोध सुरु केला असता संबंधित गाडी गुजरातमध्ये असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर गुजरात पोलिसांशी संपर्क साधून गाडी अडवून दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांचं एक पथक आरोपींचा ताबा घेण्यासाठी गुजरातला रवाना झालं आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक पंकज पवार यांनी दिली. गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोन्ही आरोपी राजस्थानचे असून ते पुणे फिरायला आले होते. आरोपींबद्दल अजून सगळी माहिती मिळालेली नाही, त्यांना पुण्यात आणल्यानंतर त्या चालकाला ते आधीपासून ओळखत होते की केवळ चोरीसाठी हा प्रकार त्यांनी केला याबाबत चौकशी केली जाईल अशी माहिती पवार यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2019 12:19 pm

Web Title: pune two men book ola cab to murder driver steal car sas 89
Next Stories
1 मोसमी पाऊस दुष्काळी भागांत
2 पदवीप्रदान सोहळ्यासाठी हातमागाचे कापड वापरा!
3 उदयनराजे जरी तुम्ही शरद पवारांबरोबर असला, तरी आतून आमच्या बरोबरच आहात : आठवले
Just Now!
X