पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणे आता विद्यार्थ्यांसाठी अधिक आव्हानात्मक असणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थ्यांना परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यामध्ये तीस टक्के आणि एकूण चाळीस टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.
पुणे विद्यापीठाने अभियांत्रिकी शाखेच्या परीक्षा ऑनलाईन सुरू केल्या. यामध्ये पन्नास गुणांची ऑनलाईन बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असलेली परीक्षा आणि पन्नास गुणांची लेखी विश्लेषणात्मक प्रश्न असलेली परीक्षा असे स्वरूप आहे. आतापर्यंत या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान चाळीस टक्के गुण मिळणे आवश्यक होते. त्यामुळे ऑनलाईन परीक्षेमधील गुणांच्या आधारे विद्यार्थी उत्तीर्ण होत असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने आता नियमामध्ये बदल केला आहे.
नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक परीक्षेमध्ये किमान गुणांचा निकष पूर्ण करावा लागणार आहे. ऑनलाईन परीक्षेच्या तीन टप्प्यांमध्ये मिळून ३० टक्के गुण, लेखी परीक्षेमध्ये तीस टक्के म्हणजे १५ गुण मिळणे गरजेचे आहे. या शिवाय सर्व परीक्षा मिळून एकूण ४० टक्के गुण मिळवणे आवश्यक असणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून (२०१४-१५) हे नवे निकष लागू करण्यात येणार आहेत.