सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून या वर्षीचा जीवनसाधना गौरव पुरस्कार अमोल पालेकर, डॉ. मीरा बोरवणकर, डॉ. सुधा कांकरीया, गंगाधर पानतावणे, डॉ. प्रमोद काळे, नीलिमा वसंतराव पवार आणि शांतीलाल मुथ्था यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’ देण्यात येतात. या वर्षी ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, पोलिस महासंचालक डॉ. मीरा बोरवणकर, स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी काम करणाऱ्या डॉ. सुधा कांकरीया, ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे, पद्मश्री डॉ. प्रमोद काळे, सामाजिक क्षेत्रात काम करणारे नीलिमा वसंत पवार, शांतीलाल मुथ्था यांना देण्यात येणार आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. वर्षभरात चांगली कामगिरी करणारी महाविद्यालये, प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी यांचाही सन्मान या वेळी करण्यात येणार आहे. वर्धापन दिन समारंभ बुधवारी (१० फेब्रुवारी) होणार आहे.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. कर्नाटक संगीतातील ज्येष्ठ गायक टी. एम. कृष्णा यांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले असून भारतरत्न सुब्बालक्ष्मी यांचे ते शिष्य आहेत. बुधवारी सायंकाळी ६ वाजता आयुकाच्या चंद्रशेखर सभागृहात ही मैफल होणार आहे.