पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांवर आता विद्यापीठ प्रशासनाचा कोणत्याही प्रकारचा धाक राहिलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परीक्षा सुधार समितीने परीक्षा घेण्यास बंदी घातलेल्या काही महाविद्यालयांनी परीक्षा मंडळाच्याच निर्णयाचे उल्लंघन करून शनिवारी परीक्षा घेतल्याचे उघड झाले आहे. त्रुटी असलेल्या या महाविद्यालयांना विद्यापीठानेच ढिलाई दिल्याचे समजते आहे.
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा सुधार समितीने काही महिन्यांपूर्वी विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांची पाहणी केली. वर्षांनुवर्षे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या, विद्यापीठांच्या स्थानिक पाहणी समितीने मान्यता दिलेल्या या महाविद्यालयांमध्ये परीक्षेच्या नियोजनामध्ये अडचणी येत होत्या. त्यामुळे मुळात विद्यापीठाच्या संलग्नीकरण विभागाचे काम हे परीक्षा मंडळाच्या निर्णयानुसार परीक्षा विभागाने केले. त्यावेळी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ७६ महाविद्यालयांमध्ये प्राथमिक पायाभूत सुविधाही नसल्याचे दिसून आले. अनेक महाविद्यालयांचे पत्ते भलतेच होते, काही महाविद्यालयांमध्ये प्राचार्य नव्हते, संगणकांची सुविधा नव्हती, विद्यापीठाचा गुणवत्ता सुधार योजनेचा निधी घेऊनही महाविद्यालयांनी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध केल्या नव्हत्या. त्यामुळे त्रुटी असलेल्या महाविद्यालयांमध्ये परीक्षा घेण्यात येऊ नयेत असा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला.
या निर्णयाची अंमलबजावणी आताच्या परीक्षेपासून करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठाच्या परीक्षा ९ एप्रिलपासून सुरू होणार होत्या. मात्र, परीक्षा मंडळाची बैठक ३ एप्रिलला झाली, त्यानंतर या निर्णयावर कुलगुरूंची स्वाक्षरी होऊन त्याबाबत महाविद्यालयांना सूचना देण्यास ७ तारीख उजाडली. त्यामुळे या निर्णयाला १९ एप्रिलपर्यंत स्थगिती देण्यात आली. मात्र, १९ एप्रिलपासून परीक्षा घेण्यास बंदी घातलेल्या महाविद्यालयांनी परीक्षा घेऊ नयेत असे आदेश परीक्षा विभागाने दिले. असे असूनही महाविद्यालयांनी मात्र, विद्यापीठाला ठेंगा दाखवला आहे. बंदी घातलेल्या नगर, नाशिक जिल्ह्य़ांतील बहुतेक महाविद्यालयांनी शनिवारी (१९ एप्रिल) परीक्षा घेतल्या. परीक्षेचे साहित्य जवळच्या महाविद्यालयामधून आणून या परीक्षा घेण्यात आल्या.