पुणे विद्यापीठ आणि योगायोग यांचे नाते दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत चालले आहे. असाच एक योगायोग पुणे विद्यापीठात गुरुवारी जुळून आला. उच्च शिक्षण खात्यातील एक अधिकारी खास मुंबईहून पुणे विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या भेटीला आला आणि ‘नेमक्या’वेळी आलेल्या अधिकाऱ्यामुळे विद्यापीठाच्या कचेऱ्यांमध्ये होणाऱ्या कुजबुजीचा आवाज थोडा मोठा झाला.
पुणे विद्यापीठामध्ये गुरुवारी सकाळपासूनच थोडी धावपळ गडबड सुरू होती. आता विद्यापीठात सकाळच्या वेळी धावपळ असण्यात तसे काही नवीन नाही. पण तरीही आजची धावपळ काही वेगळी आहे, याची जाणीव अगदी शिपायांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांना झाली होती. विद्यापीठातील काही अधिकारी अगदी अचूक वेळी विद्यापीठात हजर होते. परीक्षा विभाग, संलग्नीकरण विभाग, प्रशासकीय विभाग, नॅक विभाग अशा विभागांतील अधिकारी हळूच एकमेकांच्या कक्षात शिरून अंदाज घेत होते. कर्मचारीही आज काहीतरी वेगळे आहे. ते काय? हे शोधण्यासाठी आटापीटा करत होते. आदल्याच दिवशी कुलगुरूंबरोबर विद्यापीठातील अधिकाऱ्यांची चांगली तास-दोन तास बैठक झाल्यामुळे कुठल्या अधिकाऱ्याला मेमो मिळाला की काय. असेही अंदाज बांधले जात होते.
सकाळचा अगदी थोडा वेळ या घालमेलीमध्ये गेला. थोडय़ा वेळाने मात्र विद्यापीठात अगदी सगळीकडे उच्च शिक्षण विभागातील कुणी अधिकारी येणार असल्याची बातमी लागली. त्यानंतर मात्र कुजबुजीला थोडे वेगळे वळण मिळाले. ‘आले का?. कुठे? गेस्ट हाउस.? भेटायला कोण जाणार .? अरे त्यांना का निवडलं.? असे प्रश्न वेगवेगळ्या विभागांमधील टेबलांवर फिरू लागले. अखेरीस. उच्च शिक्षण विभागात हाती जादूची कांडी घेऊन बसणारे ‘ते’ अधिकारी आले. विद्यापीठातील काही विभागांमधील अधिकारी त्यानंतर आपापल्या कक्षातून अचानक गायब झाले. ते तब्बल दोन तास! नाइलाजाने आपापल्या विभागांमध्ये बसावे लागलेले अधिकारी गेस्ट हाउसमधील ताज्या बातम्या गोळा करण्याच्या मागे लागले.
मात्र.. पुणे विद्यापीठासारख्या मोठय़ा, नावाजलेल्या विद्यापीठामध्ये उच्च शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याच्या येण्याने इतकी खळबळ उडण्याचे कारण तरी काय.. योगायोग! विद्यापीठातील अधिकाऱ्यांची कामे, मागण्या शासन दरबारी रखडल्या आहेत. आता अशा बिकट परिस्थितीमध्ये ‘नेमक्या’वेळी उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्याचे पुणे विद्यापीठाच्या गेस्ट हाउसमध्ये येणे. या योगायोगाने विद्यापीठाच्या कट्टय़ांवर, पारांवर, विभागांमध्ये चर्चेला खमंग विषय दिला.