— चिन्मय पाटणकर

एनआयआरएफ क्रमवारीत नववे स्थान, टाइम्स उच्च शिक्षण क्रमवारीत जागतिक पातळीवर ५०१ ते ६०० क्रमवारीत स्थान मिळाल्याचा डंका पिटणाऱ्या विद्याापीठाच्या उत्तरपत्रिकांच्या तपासणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या चार वर्षांत सावित्रीबाई फुले पुणे विद्याापीठातील विविध अभ्यासक्रमाच्या तब्बल ६ लाख ४५ हजारहून अधिक विद्याार्थ्यांनी उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला. तसेच या प्रक्रियेसाठी आकारलेल्या शुल्कातून सुमारे वीस कोटी रुपये मिळाल्याने विद्याापीठ मालामाल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

‘लोकसत्ता’ने दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जाला विद्याापीठाकडून देण्यात आलेल्या उत्तरातून ही माहिती स्पष्ट झाली. २०१५ ते २०१८ या कालावधीत अर्ज केलेल्या विद्याार्थ्यांची आकडेवारी देण्यात आली. त्यात उत्तरपत्रिकेच्या छायाप्रत आणि गुणपडताळणीसाठी ४ लाख २५ हजार ६०४ विद्याार्थ्यांनी आणि पुनर्मूल्यांकनासाठी २ लाख १९ हजार ८८२ विद्याार्थ्यांनी अर्ज केला. गेल्या चार वर्षांत विद्याापीठाला छायाप्रती, पुनर्मूल्यांकन आणि गुणपडताळणीच्या शुल्कापोटी एकूण १९ कोटी ५७ लाख २० हजार १० रुपये मिळाले. त्यात २०१६-१७ मध्ये केवळ छायाप्रतींसाठी सर्वाधिक ४ कोटी १५ हजार ५०० रुपये आणि २०१७-१८ मध्ये केवळ पुनर्मूल्यांकनासाठी सर्वाधिक ३ कोटी ३१ लाख ९७ हजार ८०० रुपये मिळाले.

अलीकडेच अभियांत्रिकी शाखेच्या विद्याार्थ्यांनी केलेल्या आंदोलनावेळी विद्याापीठाची पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया सदोष असल्याचा आक्षेप घेतला होता. आता केवळ पुनर्मूल्यांकनच नाही, तर एकूणच उत्तरपत्रिकांच्या तपासणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

अन्य विद्याापीठांकडून उत्तर नाही

राज्यातील सर्व अकृषी विद्याापीठांत छायाप्रती, गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या विद्यााथ्र्यांची संख्या आणि त्यातून जमा झालेली रक्कम याची माहिती ‘लोकसत्ता’ने माहिती अधिकारातून उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडे मागितली होती. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने सदर अर्ज संबंधित ११ अकृषी विद्याापीठांना पाठवत असल्याचे २९ सप्टेंबर रोजी स्पष्ट केले. मात्र, त्यानंतर केवळ पुणे विद्याापीठाने या अर्जाला उत्तर दिले. अन्य १० विद्याापीठांकडून या अर्जाला अद्याापही उत्तर देण्यात आलेले नाही. त्यामुळे या विद्याापीठांतील माहिती अधिकारासंदर्भात होणाऱ्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

मुंबई विद्याापीठाबाबतही प्रश्नचिन्हच

मुंबई विद्याापीठाच्या विविध विद्यााशाखांमध्ये सुमारे ९७ हजार ३१४ हजार विद्याार्थ्यांनी २०१७ मध्ये पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केल्याचे आणि पुनर्मूल्यांकनानंतर त्यातील ३५ हजार विद्याार्थी उत्तीर्ण झाल्याचे विहार दुर्वे यांनी केलेल्या माहिती अधिकारातून समोर आले होते. त्यामुळे उत्तरपत्रिकांच्या तपासणीचा प्रश्न मुंबई विद्याापीठातही असल्याचे दिसून येते.