पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेच्या अधिष्ठात्यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये आपली मुले विद्यापीठाच्या कार्यकक्षेत अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण घेत असल्याची माहिती दिली नसल्याचे कबूल करतानाच दुसरीकडे मात्र या अधिष्ठात्यांवर कारवाई करण्यात विद्यापीठाकडून दिरंगाई करण्यात येत आहे. विद्यापीठ या अधिष्ठात्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा विद्यापीठात आहे.
पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेचे अधिष्ठाता डॉ. गजानन खराटे यांची मुले अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण घेत असल्याची माहिती या अधिष्ठात्यांनी विद्यापीठाला दिली नाही. या अधिष्ठात्यांची मुलगी अभियांत्रिकी शाखेचे पदव्युत्तर शिक्षण घेत होती. तर मुलगा अजूनही अभियांत्रिकी शाखेचे पदवीचे शिक्षण घेत आहे. मात्र, याबाबत डॉ. खराटे यांनी विद्यापीठाला अंधारात ठेवल्याची तक्रार आहे. नियमानुसार आपली मुले जर विद्यापीठाच्या परीक्षा देणार असतील, तर त्याबाबत परीक्षा विभागातील अधिकारी, अभ्यास मंडळाचे सदस्य, अधिष्ठाता यांनी विद्यापीठाला माहिती देणे आवश्यक असते. मात्र, डॉ. खराटे यांनी याबाबत माहिती दिली नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये आपली मुले शिकत असल्याची माहिती विद्यापीठाच्या अधिकार मंडळातील तीनच सदस्यांनी विद्यापीठाला दिली आहे. त्यामध्ये डॉ. खराटे यांचा समावेश नसल्याची कबुली विद्यापीठानेच दिली आहे. माहिती अधिकारांतर्गत मागवलेल्या माहितीमधून ही बाब समोर आली आहे. मात्र, असे असूनही या प्रकरणी विद्यापीठाने कारवाई केलेली नाही.
डॉ. खराटे यांच्याबाबत विद्यापीठाकडे तक्रार केल्यानंतर हे प्रकरण परीक्षेसंबंधीच्या तक्रारी आणि त्रुटींसाठी नेमण्यात येणाऱ्या समितीकडे (लॅप्सेस कमिटी) देण्यात आले. मात्र, अधिष्ठात्यांबद्दलच्या या तक्रारीबाबत समितीने अद्यापही अहवालच दिला नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनच या अधिष्ठात्यांना पाठीशी घालण्याच्या प्रयत्नात आहे का? असा प्रश्न विद्यापीठ वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे. याबाबत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्याशी आणि समितीच्या सदस्यांशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.