एकीकडे काही अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी स्पर्धा वाढत असताना प्रवेश परीक्षा आणि प्रवेश प्रक्रिया अधिक कडक करण्याऐवजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रवेश प्रक्रियेतील मुलाखतींचा टप्पा वगळून टाकला आहे.
विद्यापीठाच्या विविध विभागांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश हे परीक्षेच्या माध्यमातून करण्यात येतात. यापूर्वी अनेक विभागांमध्ये लेखी परीक्षा, त्यानंतर समूह चर्चा, मुलाखत अशी दिव्ये विद्यार्थ्यांना पार करावी लागत होती. मात्र, गेली काही वर्षे प्रवेश प्रक्रियेचे निकष विद्यापीठाने शिथिल करत आणले आहेत. बहुतेक विभागांच्या प्रवेश प्रक्रियेतून समूह चर्चा यापूर्वीच वगळण्यात आल्या होत्या. आता प्रवेश प्रक्रियेतील मुलाखतीचा टप्पाही विद्यापीठाने वगळला आहे. कोणत्याही विभागाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मुलाखती घेणे आवश्यक नसल्याचे पत्र विद्यापीठाने विभागांना पाठवले आहे. यापुढे विद्यापीठाच्या सर्वच विभागांची प्रवेश प्रक्रिया ही लेखी परीक्षा आणि विद्यार्थ्यांना पदवीला मिळालेल्या गुणांच्या आधारे करण्यात यावी, अशी सूचना विद्यापीठाने सर्व विभागांना दिल्या आहेत.
विद्यापीठातील कला आणि मानस-नीती शाखेतील काही अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ही तीन टप्प्यांत करण्यात येत होती. पहिल्या टप्प्यांत लेखी परीक्षेच्या माध्यमातून पुढील टप्प्यांसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात येत असे. त्यानंतर समूह चर्चा आणि मुलाखत घेऊन तिन्ही टप्प्यांच्या गुणांच्या आधारे अंतिम निकाल प्रसिद्ध होत असे. समूहचर्चेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे विषयाचे आकलन, समूहात आपले म्हणणे मांडण्याची क्षमता अशा गोष्टींची पाहणी करण्यात येत असे, तर मुलाखतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या स्वभाव वैशिष्टय़ाचा अंदाज येत असे. मात्र,आता हे बंद करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. भाषा अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा विद्यापीठाने यापूर्वीच बंद केल्या आहेत. आता मानस नीती विद्याशाखेतील विभागांना प्रवेश मुलाखती न घेता प्रवेश देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विद्यापीठाच्या या निर्णयाबाबत शिक्षक वर्गात मात्र नाराजी आहे. ‘लेखी परीक्षेत गैरप्रकार घडू शकतात. मात्र, मुलाखती किंवा समूहचर्चेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा नेमका कल लक्षात येतो. विद्यार्थ्यांंच्या गुणांची योग्य पारख होते,’ असे मत शिक्षकांनी व्यक्त केले आहे. विद्यापीठाची भूमिका मात्र अगदी उलट आहे. प्रवेश देताना विद्यार्थ्यांचे एकाच पातळीवर मूल्यांकन होणे गरजेचे आहे. मुलाखतीमध्ये परीक्षकाच्या हातात प्रवेश प्रक्रिया जाते. त्यामुळे लेखी परीक्षेच्या माध्यमातूनच प्रवेश प्रक्रिया होणे योग्य असल्याचे मत विद्यापरिषदेतील एका सदस्यांनी व्यक्त केले.