पुणे विद्यापीठात होणाऱ्या चोऱ्या. चंदनाच्या झाडांची चोरी. सुरक्षारक्षकाचा खून अशा अनेक घटनांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे पुणे विद्यापीठाच्या परिसराचे पहिल्यांदाच चतु:श्रुंगी पोलीस, विशेष शाखा, गुप्तवार्ता विभाग यांनी दोन महिन्यांपूर्वी ‘सुरक्षा ऑडिट’ केले. यामध्ये सुरक्षिततेबाबत अनेक त्रुटी आढळून आल्या असून त्याची पूर्तता करण्याच्या सूचना विद्यापीठाला करण्यात आल्या आहेत. आता त्याची पूर्तता कधी होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या काही वर्षांपासून घडणाऱ्या घटनांमुळे पुणे विद्यापीठाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याबाबत पुणे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांना भेटून सुरक्षेचा आढावा घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार पुणे विद्यापीठाच्या ४११ एकर परिसराची चतु:श्रुंगी पोलीस, विशेष शाखा, गुप्तवार्ता विभाग यांनी पाहणी केली. त्या वेळी विद्यापीठाच्या सुरक्षिततेत अनेक त्रुटी असल्याचे आढळून आले. सुरक्षिततेबाबत काय उपाययोजना कराव्या लागतील, या बाबत या पथकाने विद्यापीठाचा परिसर पाहून सूचना केल्या आहेत.
याबाबत चतु:श्रुंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी सांगितले की, विद्यापीठाची सध्याची संरक्षक भिंत ही सहा फूट उंच आहे. भिंतीची उंची वाढविणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी भिंत तुटलेल्या स्थितीत असल्यामुळे विद्यापीठात कोणीही सहज प्रवेश करू शकतो. याचबरोबर अनेक ठिकाणी झाडांच्या फाद्या या भिंतीवर आलेल्या आहेत. त्यावरूनही आत-बाहेर करता येणे शक्य आहे. भिंतीला लागूनच पाथ-वे करण्याचे विद्यापीठाला सुचविण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस आणि सुरक्षारक्षकांना भिंतीलगत गस्त घालता येणे शक्य होईल. त्याचा फायदा सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनाही होऊ शकतो. विद्यापीठाच्या सुरक्षिततेबाबत प्राथमिक गोष्टींकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठात जाण्या-येण्याचे मार्ग वेगळे करण्याची सूचना
विद्यापीठात येण्यासाठी बरेच मार्ग आहेत, जे सुरक्षिततेच्या दृष्टीने धोक्याचे आहे. त्यामुळे विद्यापीठात येण्याचा आणि जाण्याचा मार्ग वेगवेगळे करण्याची आवश्यकता आहे. विद्यापीठात येण्याच्या आणि जाण्याच्या मार्गावर सुरक्षारक्षक  असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर विद्यापीठ परिसरात पुरेशी प्रकाशव्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, बॅग स्कॅनर, फिंगरप्रिंट स्कॅनर अशा अत्याधुनिक व्यवस्था बसविण्याचे सुचविण्यात आले आहे. सुरक्षा आढावा घेतल्यानंतर सूचनांची एक प्रत विद्यापीठाला देण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक निकम यांनी दिली.
सीसीटीव्ही सुरक्षारक्षक वाढविण्याची गरज
सध्या पुणे विद्यापीठात १२० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याचबरोबर १३० सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. विद्यापीठाचा परिसर पाहता सुरक्षारक्षकांमध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर आणखी शंभर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे आहे.