बायोडेटा विद्यापीठाकडे उपलब्धच नसल्याचे प्रशासनाचे माहिती अधिकारात उत्तर

संशोधन क्षेत्रात चांगली कामगिरी करणारे विद्यापीठ म्हणून नावलौकिक असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कुलगुरूंचे शोधनिबंध, पेटंट्स याची माहितीच नसल्याचे समोर येत आहे.  कुलगुरूंचा बायोडेटाही विद्यापीठाकडे नसल्याचे उत्तर विद्यापीठ प्रशासनाकडून पुन्हा एकदा माहिती अधिकारातील अर्जाला देण्यात आले आहे. ‘बायोडेटा’ तयार करण्याची वेळच आली नसल्याचे कुलगुरूंचे म्हणणे आहे. त्यामुळे कुलगुरूंच्या बायोडेटावरून नव्याने वाद सुरू झाला आहे.

कोणत्याही शिक्षणसंस्थेत किंवा आस्थापनेत काम करणाऱ्या व्यक्तींचा ‘बायोडेटा’ असणे अपेक्षित असते. त्या बायोडेटाच्या आधारेच त्या पदावर संबंधित व्यक्तीची निवड केली जाते. मात्र विद्यापीठाकडे कुलगुरूंचा बायोडेटाच उपलब्ध नसल्याचे उत्तर विद्यापीठाच्या प्रशासनाकडून माहिती अधिकारात दिले जात असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ ने यापूर्वी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर जवळपास वर्षभराने पुन्हा एकदा विद्यापीठात कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या बायोडेटाची मागणी करणारा अर्ज माहिती अधिकार कायद्यांतर्गत विद्यापीठात करण्यात आला. डॉ. अतुल बागूल यांनी हा अर्ज केला होता. मात्र ‘विद्यापीठाकडे कुलगुरूंचा बायोडेटाच नाही,’ असे उत्तर या अर्जालाही देण्यात आले. कुलगुरूंनी प्रसिद्ध केलेले संशोधन निबंध, त्यांना मिळालेले पेटंट्स अशी माहितीही विद्यापीठाकडे उपलब्ध नसल्याचे उत्तर देण्यात येत आहे. वर्षभरापूर्वीही कुलगुरूंचा बायोडेटा मागणारा अर्ज विद्यापीठाकडे आला होता. मात्र त्यानंतरही विद्यापीठाकडून कुलगुरूंचा बायोडेटा कसा तयार करण्यात आला नाही, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

 

विद्यापीठात पारदर्शकता का नाही?

विद्यापीठाकडून सातत्याने माहिती दडवली जाते. कुलगुरूंचा बायोडेटा, त्यांनी केलेल्या संशोधनाचे तपशील विद्यापीठाने त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मात्र विद्यापीठाकडून बायोडेटासारखी माहिती का दडवली जाते. कारभारात पारदर्शकता का नाही?

– डॉ. अतुल बागूल, माजी अधिसभा सदस्य


कुलपती कार्यालयात बायोडेटा मिळतो..

विद्यापीठाकडे कुलगुरूंचा बायोडेटा मागणाऱ्या अर्जाला गेल्या वर्षी विद्यापीठ प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्याबाबत संबंधित अर्जदाराने कुलपती कार्यालयाकडे विचारणा केली होता. त्या अर्जाला प्रतिसाद देऊन कुलगुरूंनी पदासाठी अर्ज करताना दिलेला बायोडेटा कुलपती कार्यालयाकडून मात्र संबंधित अर्जदाराला उपलब्ध करून देण्यात आला.


कुलगुरू म्हणतात.. बायोडेटा तयारच केला नाही

मी पहिल्यापासून विद्यापीठातच आहे. मी रुजू झालो त्यावेळी बायोडेटा तयार केला होता. त्यानंतर मी पदोन्नतीने वरच्या पदांवर गेलो. त्यानंतर महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळाचा संचालक आणि नंतर कुलगुरू झालो. त्यावेळी बायोडेटा द्यावा लागत नाही. एक अर्ज भरून द्यावा लागतो. माझी प्राथमिक ओळख करून देता येईल, असा बायोडेटा सर्व महाविद्यालयांकडे आहे. या बाबीचे आश्चर्य वाटू शकते. मात्र तपशिलातील बायोडेटा तयार करण्याची वेळ माझ्यावर आलीच नाही.

– डॉ. वासुदेव गाडे,कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ