17 December 2017

News Flash

कुलगुरू रमले स्मरणरंजनात

डॉ. करमळकर यांनी खानावळीची पाहणी करतानाच ते स्मरणरंजनात रमून गेले.

प्रतिनिधी, पुणे | Updated: October 12, 2017 4:28 AM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी बुधवारी विद्यापीठाच्या खानावळीला अचानक भेट दिली. आपल्याबरोबर रांगेत उभे राहिलेल्या कुलगुरूंना पाहून विद्यार्थीही काही वेळ गडबडून गेले.

विद्यापीठाच्या खानावळीला अचानक भेट

बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या खानावळीत विद्यार्थ्यांची नेहमीसारखी गडबड सुरू होती. जेवण वाढणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हाकारे सुरू होते. अचानक विद्यार्थ्यांच्या रांगेत ताट घेऊन उभ्या असणाऱ्या व्यक्तीकडे बोट दाखवून विद्यार्थ्यांची कुजबुज सुरू झाली. रांगेत चक्क विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर उभे होते. आपल्या विद्यार्थीदशेत ‘कॅन्टीन समिती’ सांभाळणाऱ्या डॉ. करमळकर यांनी खानावळीची पाहणी करतानाच ते स्मरणरंजनात रमून गेले.

विद्यापीठाबाहेरील एका कार्यक्रमानंतर दुपारी आपल्या कार्यालयाकडे जाण्याऐवजी डॉ. करमळकर यांनी खानावळीकडे मोर्चा वळवला. विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी कुणालाही बरोबर न घेता ते खानावळीत गेले. पास असलेल्यांची रांग, पास नसलेल्यांची रांग असा सगळा गोंधळ समजून घेत जेवणाच्या रांगेत ताट घेऊन उभे राहिले. त्यानंतर कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम आणि इतर काही अधिकारीही खानावळीत पोहोचले. कुलगुरूंबरोबर सेल्फी काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असलेल्या डॉ. करमळकर यांनी पुन्हा एकदा आपले जुने दिवस अनुभवले. विद्यापीठाची आताची खानावळ आणि पूर्वीची खानावळ याबाबत डॉ. करमळकर म्हणाले, ‘मी विद्यार्थी असताना परिस्थिती खूपच वेगळी होती. आताइतकी गर्दी तेव्हा नसायची. आम्ही अगदी निवांतपणे खानावळीत जेवायचो. मी पीएच.डी करत असताना मी विद्यार्थ्यांच्या कॅन्टिन समितीत होतो. त्या वेळी जेवणात कधीकधी पोरकिडे सापडायचे. त्या वेळी हरभऱ्याची अगदी पातळ आमटी हा खानावळीच्या व्यवस्थापनाचा आवडीचा पदार्थ होता.

आठवडय़ातील बहुतेकदा ही आमटी असायची. त्या वेळी आम्हीही कुलगुरूंना ओढून खानावळीत जेवायला नेले होते. आम्ही विद्यार्थी इतके आक्रमक नव्हतो. पण खानावळ, त्याची रांग या सगळ्यात मजा होती. आज माझा हेतू खानावळीची अचानक पाहणी करण्याचा असला तरी मी खानावळीच्या वातावरणाची मजाही अनुभवली. विद्यार्थ्यांच्या खानावळीबाबत तक्रारी असतात. त्यामुळे मी गेल्यावर विद्यार्थी कसा प्रतिसाद देतील असे मला वाटले होते. मात्र विद्यार्थ्यांनी अजिबात तक्रारी केल्या नाहीत, छान प्रतिसाद दिला.’

विद्यापीठात फूड मॉल होणार

विद्यापीठात वेगवेगळ्या प्रदेशातील विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना त्यांच्या संस्कृतीचे खाणे मिळावे यासाठी विद्यापीठात फूड मॉल उभा करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याचे डॉ. करमळकर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे ‘खानवळीसाठी थोडी जागा कमी पडते आहे असे लक्षात आले. त्यानुसार काही बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र खानावळीतील पदार्थाचा दर्जा आणि त्यांचे प्रमाणही चांगले असल्याचे दिसले,’ असेही डॉ. करमळकर यांनी या वेळी सांगितले.

First Published on October 12, 2017 4:28 am

Web Title: pune university vice chancellor nitin karmalkar visited university canteen