विद्यापीठ कुणासाठी. असाच प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. विभागांमधील अडचणी, शैक्षणिक प्रश्न घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात येणाऱ्या विद्यार्थ्यांना कुलगुरूंची भेटीची वेळ मिळण्यासाठी आता तीनचार महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. इतकेच नव्हे तर विद्यार्थी दरबार भरवण्याचे कुलगुरूंचे आश्वासनही हवेतच विरले आहे.
आपल्या शैक्षणिक अडचणी मांडण्यासाठी किंवा आपले म्हणणे मांडण्यासाठी कुठे जायचे असा प्रश्न आता विद्यार्थ्यांना पडू लागला आहे. अगदी तातडीच्या प्रश्नांसाठीही विद्यार्थी, शिक्षक आणि महाविद्यालयांच्या प्रशासनांनाही कुलगुरूंना भेटणे मुश्कील झाले असल्याची तक्रार विद्यार्थी आणि शिक्षक करत आहेत. दोनतीन महिने तरी कुलगुरूंच्या भेटीची वेळ मिळू शकत नसल्याचे उत्तर विद्यापीठाच्या प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना मिळत आहे. सगळ्या विभागांचे उंबरे झिजवून कंटाळलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांची पावले अखेरीस कुलगुरू कार्यालयाकडे वळतात. मात्र, तिथेही भेटीची वेळ मिळणेच मुश्कील झाले आहे.
पीएच.डी.च्या प्रवेश प्रक्रियेबाबतच्या तक्रारी, शैक्षणिक विभागांमधील कामांबाबतच्या तक्रारी याबाबत काहीही तोडगा निघत नसेल आणि कुलगुरू कार्यालयाकडूनही वेळ मिळत नसेल, तर या तक्रारी नेमक्या कुणाकडे मांडायच्या असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. कोणत्या तरी संघटनेचा किंवा विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या सदस्यांचा पदर धरूनच विद्यापीठात आपली समस्या मांडायची का, असा प्रश्न विचारला जात आहे.
यापूर्वीही विद्यापीठाच्या आवारात वसतिगृहाच्या, भोजनालयाच्या समस्यांबाबत विद्यार्थ्यांनी केलेली आंदोलने, बहि:स्थ विद्यार्थ्यांबाबत झालेली आंदोलने अशा प्रत्येक आंदोलनावेळी कुलगुरूंनी आठवडय़ातील काही वेळ हा विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी राखून ठेवावा अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार प्रत्येक आंदोलनानंतर विद्यार्थ्यांच्या मागण्यांना प्रतिसाद देताना, विद्यार्थी दरबार सुरू करणार असल्याची आश्वासनेही कुलगुरूंनी दिली होती. अधिसभेतही हा विषय गाजला होता. मात्र, आश्वासनातला हा विद्यार्थी दरबार प्रत्यक्षात कधीही भरलाच नाही. त्यामुळे आपल्या समस्या मांडण्यासाठी विद्यार्थ्यांच्या हक्काचा वेळ त्यांना मिळत नसल्याचे तक्रार केली जात आहे.