करोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत प्रतिबंधात्मक सुधारित आदेश पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहेत. हे आदेश सोमवार ७ जूनपासून पुढील आदेशापर्यंत पुणे महानगरपालिका क्षेत्रात लागू असणार आहेत. तसेच, या आदेशाचे पालन न करणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई देखील केली जाणार आहे.

या आदेशानुसार, पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा मधील नमूद दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. अत्यावश्यक दुकाना व्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहती. शनिवार व रविवार पूर्णत: बंद राहतील. मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह संपूर्णत: बंद राहतील. रेस्टॉसंट, बार, फुड कोर्ट हे सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजपेर्यंत आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. दुपारी ४ नंतर तसेच, शनिवार व रविवार केवळ पार्सल सेवा, घरपोच सेवा रात्री ११ पर्यंत सुरू राहील.

तसेच, पुणे महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे(उद्याने), खुली मैदाने, चालणे व सायकलिंग आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत सुरू राहातील. सुट देण्यात येत असेल्या आस्थापना, सेवा व्यतिरिक्त खासगी कार्यालये कामाचे दिवशी ५० टक्के कर्मचारी क्षमतेने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहातील. तर, पुणे मनपा क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा व कोविड-१९ व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय कार्यालये १०० टक्के क्षमतेने सुरू राहतील. अत्यावश्यक व करोना विषयक कामकाज करणाऱ्या कार्यालयां व्यतिरिक्त शासकीय कार्यालये ५० टक्के अधिकार, कर्मचारी उपस्थितीत सुरू राहतील. सर्व आउटडोअर स्पोर्टस सर्व दिवस सकाळी ५ ते ९ वाजपेर्यंत यावेळेत सुरू राहतील. सामाजिक, धार्मिक, कार्यक्रम व मनोरंजन कार्यक्रमास ५० लोकांच्या उपस्थितीत सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत परवानगी राहील. लग्न समारंभ कार्यक्रम जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी राहील. अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्याच्याशी निगडीत कार्यक्रम जास्तीत जास्त २० लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी राहील. विविध बैठका, सभा, संस्थांच्या निवडणुका ५० टक्के उपस्थितीत घेण्यास परवानगी राहील. ई-कॉमर्स सेवांना सर्व वस्तू व सेवा यांचा पुरवठा करण्यासाठी परवानगी राहील. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालाची विक्री करणारी दुकाने हे आठवड्यातील सर्व दिवस दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहातील.

याचबरोबर, पुणे महापालिका क्षेत्रात सायंकाळी ५ वाजपेर्यंत ५ जास्त लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध राहील, तसेच, सायंकाळी ५ नंतर संचारबंदी लागू करण्यात येत आहे. व्यामशाळा, सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने पूर्व नियोजित वेळेनुसार दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (पीएमपीएमएल) आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू राहील. असे आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.