करोनामुळे मास्क अत्यावश्यक झाला आहे. मास्क नसेल तर नागरिकांना दंडही भरावा लागत आहे. त्यामुळे लोक मास्कशिवाय घराबाहेर पडत नसल्याचं चित्र आहे. मागील दीड वर्षापासून प्रत्येक नागरिक मास्क लावून घराबाहेर पडताना दिसत आहे. पण, मास्कच्या मदतीने पतीने पत्नीच्या नावावरील संपत्ती परस्पर नावावर करून घेतल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. पतीने मास्क लावून दुसऱ्याच स्त्रिला पत्नी म्हणून प्रशासकीय कार्यालयात उभं केलं आणि पत्नीच्या नावावरील फ्लॅट नावावर करून घेतले. या प्रकरणाची चर्चा शहरभर सुरू आहे.

या प्रकरणी पत्नीने पती राहुल जाधव विरोधात तक्रार दिली आहे. कविता जाधव असं फिर्यादी महिलेचं नाव आहे. कात्रज परिसरातील आंबेगाव पठार येथे फिर्यादी कविता यांचं राहुल जाधव यांच्याशी लग्न झालेलं आहे. या दोघांच्या लग्नाला १५ वर्ष झाले आहेत. या दोघांच्या नावे प्रत्येकी दोन फ्लॅट आहेत. घरी सर्व काही सुरळीत सुरू होतं. पण, राहुल जाधव पत्नी कविताला त्रास द्यायचा.

पतीच्या त्रासाबद्दल कविता बाहेर काही सांगत नव्हत्या. याच दरम्यान पती राहुल जाधव याने पत्नीच्या नावावरील फ्लॅट परस्पर नावावर करून घेतले. राहुल जाधव यांने १३ जुलै २०२० रोजी चेहऱ्यावर मास्क असलेल्या एका महिलेला नोंदणी कार्यालयात स्वतःची पत्नी म्हणून दाखवलं आणि पत्नीच्या नावावरील फ्लॅट परस्पर स्वतःच्या नावावर करून घेतले. हा प्रकार पती फोनवर बोलताना असताना समोर आला. त्यानंतर याबाबत शहानिशा केल्यावर दुसऱ्या महिलेच्या मदतीने फ्लॅट नावावर करण्यात आल्याचं स्पष्ट झालं. या प्रकरणी महिलेनं पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.