पै-पै करून जमवलेला ऐवज चोरटे लांबवून पसार होतात..ज्याच्या घरात चोरी होते ती व्यक्ती कोलमडून पडते. पोलिसांकडे तक्रार देऊनही फायदा होत नाही..चोरटे मोकाट फिरतात अशी नकारात्मक मानसिकता तक्रारदाराची असते.मात्र, पुणे ग्रामीण पोलिसांनी घरफोडी, दरोडा,साखळीचोरी अशा गुन्ह्य़ांचा छडा लावून चोरटय़ांना गजाआड केले. चोरटय़ांकडून जप्त केलेले दागिने, चीजवस्तू असा तीन कोटी अकरा लाख ९८हजार रूपयांचा ऐवज शनिवारी परत करून पोलिसांनी तक्रारदारांना नववर्षांची अनोखी भेट दिली.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या पाषाण मुख्यालयात आयोजित एका कार्यक्रमात विविध गुन्हय़ांत चोरटय़ांकडून जप्त करण्यात आलेला ऐवज ज्याचा त्याला परत करण्यात आला. आमदार डॉ.नीलम गोऱ्हे, ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.जय जाधव या वेळी उपस्थित होते.या वेळी विविध गुन्ह्य़ातील फिर्यादींना एकू ण मिळून तीन कोटी अकरा लाख ९८ हजार ५३६ रूपयांचा ऐवज परत करण्यात आला. या प्रसंगी तक्रारदार सुजाता नायर, सुनीता मते,सुरेश मुंदरगी,संगीता नाईक,मंगेश पालरेशा,शर्मिला ओसवाल,मनोज थोरात,शुभदा गंगाजळे यांनी भावना व्यक्त केल्या. पोलिसांविषयी आमच्या मनात नकारत्मक विचार होते. गेलेला ऐवज परत मिळणार नाही,असे आम्हाला वाटले होते. मात्र, पोलिसांनी तत्पर तपास  करून चोरलेला ऐवज परत केला. त्यामुळे आमचा पोलिसांवरचा विश्वास दृढ झाला आहे, अशी भावना तक्रारदारांनी व्यक्त केली.
डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या,‘‘आयुष्यभर जमवलेल्या पुंजीवर चोरटय़ांचा घाला ही वेदनादायी गोष्ट आहे. पोलीस हा समाजाचा अविभाज्य घटक आहे.पोलिसांविषयी अनेकांच्या मनात नकारात्मक भावना असते. मात्र, अशा उपक्रमांमु़ळे पोलिसांवरचा विश्वास दृढ होण्यास मदत होईल.’’
पोलिसांवर कामाचा ताण असतो.पण शेवटी पोलीससुद्धा माणूस आहे. त्याला ही मन असते. समाज पोलिसांकडे एका विशिष्ट दृष्टिकोनातून बघतो.चोरटय़ांकडून जप्त केलेला ऐवज परत केल्यानंतर पोलिसांनाही समाधान वाटत आहे,असे पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी सांगितले.
उपनिरीक्षक रोशन कांबळे यांनी सूत्रसंचालन केले,तर उपअधीक्षक नंदकुमार सातव यांनी आभार मानले.