देशात लस टंचाईची ओरड सुरू असतानाच केंद्राने १८ ते ४५ वर्ष वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण खुलं केलं. १ मेपासून १८ ते ४५ वयोगटातील लसीकरण सुरू होणार असलं, तरी ते लांबण्याचीच चिन्हे दिसत आहे. पुणे शहरात सध्या महापालिका आणि खासगी रुग्णालयात लसीकरण कालपर्यंत (२७ एप्रिल) सुरू होते. मात्र काल रात्रीपर्यंत महापालिकेला लस उपलब्ध झाली नाही. त्यामुळे आज (२८ एप्रिल) शहरात लसीकरण झाले नाही. तसेच उद्यासाठीही अद्यापपर्यंत लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे सरकारने अधिकाधिक लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे.

माध्यमांशी बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महापालिका हद्दीतील लसीकरणाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, “पुणे शहरात मागील महिनाभरात महापालिका प्रशासनामार्फत चांगल्या प्रकारे नियोजन केल्याने रुग्ण संख्या कमी होण्यास मदत झाली आहे. मात्र दुसर्‍या बाजूला जी रुग्ण संख्या वाढत आहे. त्यांच्या करिता आम्हाला लागणारा ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन या दोन गोष्टी उपलब्ध करून द्याव्यात. मात्र ते राज्य सरकारकडून होताना दिसत नाही,” असं त्यांनी सांगितलं.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, “लसीकरणाला परवानगी दिल्यापासून आजअखेर पहिला आणि दुसरा डोस मिळून ७ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे कालपर्यंत सर्व ठिकाणी लसीकरण सुरू होते. मात्र काल रात्रीपर्यंत आजच्याकरिता लस उपलब्ध झाली नाही. त्यामुळे शहरात लसीकरण बंद ठेवण्याची वेळ आहे. या गंभीर परिस्थितीत सरकारने अधिकाधिक मदत देण्याची गरज आहे. मात्र तसे होताना दिसत नाही,” अशी खंत देखील मोहोळ यांनी व्यक्त केली.