News Flash

पुण्यात राहून पोलीस होण्याचं स्वप्न अपूर्णच; करोनामुळे शेतकरी कुटुंबातील तरुणाचा मृत्यू

त्याचे आई वडील शेतकरी आहेत

मागील वर्षभरापासून करोना या विषाणूंने जगभरात थैमान घातले आहे. या विषाणूंमुळे लाखो जणांना प्राण गमावावा लागला आहे. सहा वर्षापासुन तयारी करणारा पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या वैभव शितोळे या तरुणाचाही करोनामुळे मृत्यू झालाय. पोलीस अधिकारी होण्यासाठी मागील सहा वर्षांपासून वैभव प्रयत्न करत होता. मात्र करोनाचा संसर्ग झाल्याने उपचारादरम्यान त्याचं निधन झालं. पोलीस अधिकारी होण्याचं वैभवचं स्वप्न अपूर्ण राहिल्याची भावना त्याचा चुलत भाऊ अविनाश शितोळे यांनी ‘लोकसत्ता डॉटकॉम’शी बोलताना व्यक्त केली. वैभवच्या जाण्याने त्यासोबत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या त्याच्या काही मित्रांनाही हळहळ व्यक्त केली आहे.

चुलत भाऊ अविनाश शितोळे यांनी वैभवच्या खडतर प्रवासासंदर्भात लोकसत्ता डॉटकॉमशी खास बातचीत केली. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथील एका शेतकरी कुटुंबात वैभवचा जन्म झाला. आई, वडील, तो आणि एक बहीण असं त्याचं चौकोनी कुटुंब होतं. आजवर शितोळे कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर चालत आला आहे. वैभवचं शालेय शिक्षण भानगावमधील श्री भानेश्वर विद्यालय येथे झालं त्यानंतर त्याने अकरावी आणि बारावीपर्यंतचं शिक्षण श्रीगोंदा येथे पूर्ण केलं. नंतर तो इंजिनियरिंगचं शिक्षण घेण्यासाठी नाशिक शहरामध्ये गेले. पण लहानपणापासून वैभवला पोलीस अधिकारी व्हायचं होतं. ते त्याचं स्वप्न होतं. हेच स्वप्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं. त्यामुळे कंम्प्युटर इंजिनिअरिंग पूर्ण करताच, २०१४ साली त्याने पुणे गाठले. त्याच दरम्यान त्याला एका चांगल्या कंपनीतून नोकरीसंदर्भात कॉल देखील आला होता. मात्र वैभवने नोकरीचा पर्याय स्वीकारला नाही आणि स्पर्धा परीक्षा देण्याचा निश्चय करून मागील सहा वर्षापासुन तो अनेक परीक्षा देत राहिला. अनेक अडचणीचा सामना करून त्याने पीएसआय लेखी परीक्षेचा टप्पा यशस्वीपणे पार झाला होता, असं अविनाशने सांगितलं.

पीएसआयची लेखी परीक्षा झाल्यानंतर प्रत्यक्ष मैदानातील परीक्षा बाकी होती. ती परीक्षा देखील वैभव नक्कीच उत्तीर्ण झाला असता असा विश्वास, अविनाशने बोलून दाखवला. “तो मैदानावर खूप मेहनत घेतल्याचे पाहिले आहे. मला म्हणायचा, दादा आता पीएसआय झालो की, त्यापुढे डीव्हाएसपी व्हायचं आहे मला. त्याने हे असं मला अनेक वेळा बोलून दाखविलं होतं. त्यात तेवढी जिद्द होती आणि तो पोलीस अधिकारी झाला देखील असता. पण त्याच दरम्यान आपल्या सर्वावर करोना आजाराचे संकट आले आणि सर्व काही ठप्प झाले. एवढ्या भयानक परिस्थिती देखील वैभव अनेक विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी पुढे येत होता. तसेच त्याचा मित्र परिवार देखील मोठा होता. सर्वाशी सतत तो संपर्कात होता,” असं अविनाश सांगतो. मागील महिन्यात स्पर्धा परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यावेळी वैभव देखील शास्त्री रोडवरील आंदोलनात सहभागी झाला होता. विद्यार्थ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम तो पुढे असायचा हे सांगत असताना अविनाश यांना अश्रू अनावर झाले.

तसेच ते पुढे म्हणाले की, “आता परीक्षा देता येणार या आनंदात होता. त्यानंतर त्याला १५ मार्च रोजी श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याने तात्काळ करोना तपासणी करून घेतली. त्यात त्याला करोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यावर १६ मार्च ते २ एप्रिल दरम्यान ससून येथे उपचार सुरू होते. तर २ तारखेला पहाटेच्या सुमारास वैभवच निधन झालं. हाताला आलेला मुलगा गेल्याचे समजल्यावर आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.” सर्वांनी या आजाराबद्दल काळजी घेऊन आपल्यासह सर्वांना सुरक्षित ठेवण्याचे आवाहन अविनाश यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 4:15 pm

Web Title: pune vaibhav shitole a young boy preparing for police exam died due to corona svk 88 scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “खूप गरम होतंय, मास्क नाही घालू शकत…”, असं म्हणणाऱ्यांसाठी पुणे पोलिसांचा खास Video
2 दुर्मीळ आजारांबाबत केंद्र सरकारचे धोरण नावापुरतेच
3 पुढील पाच दिवस तापमानवाढ
Just Now!
X