04 August 2020

News Flash

पुण्याची प्रभाग रचना पुन्हा बदलणार

पुणे महापालिका हद्दीत आणखी ३४ गावे समाविष्ट करण्याच्या निर्णयाचे अनेक परिणाम शहरावर होणार आहेत.

| June 6, 2014 03:30 am

पुणे महापालिका हद्दीत आणखी ३४ गावे समाविष्ट करण्याच्या निर्णयाचे अनेक परिणाम शहरावर होणार आहेत. महापालिकेची सध्याची प्रभाग रचना बदलून आगामी निवडणुकीत प्रभागांची संख्या दहाने आणि नगरसेवकांचीही संख्या वीसने वाढण्याची शक्यता आहे. नव्या प्रभाग रचनेमुळे सध्याच्या प्रभागांमधील काही भाग वगळले जातील, तर काही भाग नव्याने जोडले जातील. त्यामुळे नगरसेवकांना आगामी निवडणुकीसाठी सोयीस्कर प्रभागांची शोधाशोध करावी लागेल.
महापालिका हद्दीजवळ होत असलेल्या वाढत्या नागरीकरणामुळे हद्दीलगतची ३४ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय गेल्या आठवडय़ात राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाबाबत आता नागरिकांकडून हरकती-सूचना मागवण्यात आल्या असून ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गावांच्या समावेशाची रीतसर प्रक्रिया पूर्ण होईल. प्राथमिक अंदाजानुसार ही गावे महापालिकेत आल्यामुळे शहराची लोकसंख्या आठ ते दहा लाखांनी वाढण्याची शक्यता आयुक्त विकास देशमुख यांनी व्यक्त केली आहे. वाढणारी लोकसंख्या व वाढते भौगोलिक क्षेत्र यांचा विचार करता महापालिकेची सध्याची प्रभाग रचना आगामी निवडणुकीसाठी बदलावी लागेल, हेही स्पष्ट झाले आहे.
शहरात सध्या ७६ प्रभाग असून प्रत्येक प्रभागातून दोन या प्रमाणे १५२ नगरसेवक निवडून आले आहेत आणि महिला आरक्षणामुळे प्रत्येक प्रभागातील एक जागा महिलांसाठी राखीव आहे. सध्या या प्रभागातील मतदारांची संख्या सरासरी २० ते २५ हजार इतकी आहे. वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करता आठ ते दहा प्रभाग वाढतील असा अंदाज आहे आणि सध्याच्याच पद्धतीने पुन्हा निवडणूक झाल्यास नगरसेवकांची संख्या वीसने वाढेल. प्रभागांची ही रचना करताना नवी गावे व सध्याचे प्रभाग यांचा विचार करून गावे प्रभागांमध्ये समाविष्ट केली जातील. त्यामुळे सध्याच्या प्रभागांची रचना पूर्णत: बदलेल. काही भाग या प्रभागांमध्ये नव्याने समाविष्ट केले जातील, तर काही भाग वगळले जातील. तसेच प्रभाग रचनेनुसार पुन्हा आरक्षणेही बदलतील. आरक्षणे बदलल्यामुळे गेल्या वेळी काही विद्यमान नगरसेवकांना निवडणूक लढवण्यासाठी प्रभाग मिळाला नव्हता. तसेच आरक्षणामुळेही काही नगरसेवकांना आसपासच्या प्रभागातून लढावे लागले होते. सध्याच्या रचनेप्रमाणे दोन-दोन नगरसेवकांचे प्रभाग न ठेवता पुन्हा वॉर्ड रचना केल्यास वॉर्डची संख्या १७५ पर्यंत जाऊ शकते, अशी शक्यता नगरसेवकांना वाटत आहे.
प्रभाग रचना करताना त्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी महापालिका अधिकाऱ्यांच्या हातात असतात. मुख्य म्हणजे या पद्धतीत काही भाग वगळणे व काही भाग जोडणे या प्रक्रियेत काही जणांसाठी अनुकूल तर काही जणांसाठी प्रतिकूल प्रभाग करणे शक्य होते. गेल्या प्रभाग रचनेतही असे प्रकार घडले होते आणि काही प्रकरणे निवडणूक आयोगापर्यंत गेली होती.
यापूर्वीच्या चार निवडणुकांवर दृष्टिक्षेप
१९९७- वॉर्ड पद्धतीने, प्रत्येक वॉर्डमधून एक नगरसेवक, संख्या- १११
१९९७- वॉर्ड पद्धतीने, प्रत्येक वॉर्डमधून एक नगरसेवक, संख्या- १२४
२००२- प्रभाग पद्धतीने, प्रत्येक प्रभागातून तीन नगरसेवक, संख्या- १४६
२००७- वॉर्ड पद्धतीने, प्रत्येक प्रभागातून एक नगरसेवक, संख्या- १४४
२०१२- प्रभाग पद्धतीने, प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक (त्यातील एक महिला), संख्या- १५२.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2014 3:30 am

Web Title: pune ward system election new area
टॅग Election
Next Stories
1 वादळी पावसाने टॉवर कोसळले; पुन्हा विजेचे संकट
2 पुण्याला मिळाली निसर्ग मानचिन्हे! –
3 ‘मर्सिडीझ-बेंझ’चे पुण्यातील सुरुवातीचे सर्व कामगार १८ वर्षांनीही कंपनीच्या सेवेत
Just Now!
X