15 October 2019

News Flash

पुणे शहराला पूर्वीप्रमाणेच मिळणार पाणी; पालकमंत्री गिरीश बापटांची ग्वाही

मात्र, भविष्याचा विचार करता नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.

(संग्रहित छायाचित्र)

पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या चार धरणामधील पाणीसाठा लक्षात घेता शहरातील नागरिकांना पूर्वीप्रमाणे पाणी पुरवठा करण्यात येणार असून पाणी कपात केली जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. मात्र, भविष्याचा विचार करता नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.

जलसंपत्ती प्राधिकरणाच्या नियमानुसार पुणे शहराला पाणी पुरवठा करण्याचा निर्णय मागील महिन्यात झाला. त्यामुळे पुणेकर नागरिकांना पाणी कपातीला सामोरे जावे लागणार हे निश्चित मानले जात होते. मात्र, त्यापूर्वीच नागरिकांना मागील काही महिन्यापासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने त्यात आधिकच्या कपातीची भर पडणार म्हणून महापालिकेतील विरोधीपक्षाकडून महिनाभरात अनेक वेळा आंदोलने करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर आज झालेल्या बैठकीत पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे, शिवसेना गटनेते संजय भोसले आदी उपस्थित होते. यावेळी पुणे शहरात पाणी कपात न करता पूर्वीप्रमाणे पाणी पुरवठा करण्यात यावा असा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे आता पुणेकर नागरिकांवरील पाणी संकट टळले आहे.

First Published on January 10, 2019 1:22 am

Web Title: pune will get water as before says guardian minister girish bapat