पुणे शहर आणि परिसरात पुढील सहा दिवस आकाशाची स्थिती अंशत: ढगाळ राहणार आहे. त्यामुळे गारठय़ात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विदर्भातील थंडीची लाट अद्यापही कायम असून, मराठवाडय़ातही तापमानात घट झाल्याने चांगलाच गारठा जाणवतो आहे.

उत्तरेकडील राज्यातून सध्या थंड वाऱ्यांचे प्रवाह राज्याकडे येत आहेत. त्यामुळे बहुतांश भागातील किमान तापमानात घट होऊन गारठा वाढला आहे. विदर्भात सर्वच ठिकाणी आणि मराठवाडय़ात बहुतांश ठिकाणचे किमान तापमान सरासरीपेक्षा ३ ते ५ अंश सेल्सिअसने घटले आहे. त्यामुळे या भागात कडाक्याची थंडी आहे. मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर, सोलापूर, नगर आदी भागात गारठा वाढला आहे.

पुणे शहर आणि परिसरामध्ये गेल्या आठवडय़ापासून रात्रीची थंडी वाढली आहे. त्याचप्रमाणे सकाळी धुक्याची स्थिती दिसून येत आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार आणखी दोन दिवस शहरात सकाळी दाट धुके पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर १६ जानेवारीपासून आकाशाची स्थिती अंशत: ढगाळ राहणार आहे. परिणामी किमान तापमानात चढ-उतार होणार आहेत. सोमवारी शहरात १४.६ अंश किमान, तर २९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.