21 November 2019

News Flash

फांदी डोक्यावर पडून अपंग महिलेचा मृत्यू

घोले रस्त्यावर झाडाची फांदी पडून अपंग महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.

प्रतिनिधिक छायाचित्र

घोले रस्त्यावरील घटना

पुणे : घोले रस्त्यावर झाडाची फांदी पडून अपंग महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. संततधार पाऊस सुरू असताना ही दुर्घटना घडली.

जयश्री जगताप (वय ४८, रा. जगताप चाळ, कोथरूड) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. डेक्कन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगताप प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यां होत्या. पुणे महानगरपालिकेत अपंगाच्या प्रश्नासंदर्भात बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठक आटोपल्यानंतर दुपारी पावणेदोनच्या सुमारास त्या घोले रस्त्यावरील महापौर बंगल्यापासून काही अंतरावर असलेल्या चहाच्या टपरीजवळ चहा प्यायला थांबल्या होत्या. त्यांच्याबरोबर संघटनेतील सहकारी अभय जाधव तसेच आणखी एक जण होते. अचानाक आंब्यांच्या झाडाची फांदी पडली. जगताप यांच्या डोक्यात फांदी पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्याबरोबर असलेले जाधव तसेच आणखी एक सहकारी किरकोळ जखमी झाले.

जगताप यांना तातडीने घोले रस्त्यावरील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी दिली. जगताप अविवाहित होत्या. त्यांच्या पश्चात आई, विवाहित भाऊ असा परिवार आहे.

चूक कोणाची?

घोले रस्त्यावरील महापौर बंगला तसेच क्षेत्रीय कार्यालय परिसरातील झाडांची छाटणी महापालिकेच्या उद्यान विभागाकडून करण्यात आली होती. त्या वेळी कुजलेली फांदी कापली गेली नाही. संततधार पाऊस सुरू असताना ही फांदी जयश्री जगताप यांच्या डोक्यात पडली, अशी माहिती या भागातील नागरिकांनी दिली.

First Published on July 11, 2019 12:53 am

Web Title: pune women dead due to tree branch fall on her head zws 70