सध्याचे युग हे सोशल मीडियाचे असून या माध्यमातून अनेक अनोळखी व्यक्तींसोबत मैत्री होते. या मैत्रीचे चांगले तितकेच वाईट देखील अनुभव येत असतात. अशीच एक घटना पुण्यातील लोहगाव परिसरात राहणार्‍या एका महिलेसोबत घडली आहे. इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून एका महिलेला परदेशातून महागडे गिफ्ट, तसेच परदेशी चलन पाठवल्याची बतावणी अनोळखी इसमाने तब्बल नऊ लाख रूपये उकळल्याचं समोर आलंय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव परिसरामधील एक महिला खासगी कंपनीत कामाला आहे. त्या महिलेची एका तरूणा सोबत ३० मे ते २९ सप्टेंबर या पाच महिन्यांच्या कालावधीत इन्स्टाग्रामवर ओळख झाली. या दरम्यान दोघांमध्ये सतत बोलणं सुरू होतं. या काळात फिर्यादी महिलेचा आरोपी इसमाने विश्वास संपादन करून परदेशातून महागडे गिफ्ट आणि चलन पाठविण्यात आले आहे असं सांगितलं. पण हे सर्व गिफ्ट कस्टम विभागाकडे असून तेथून त्या वस्तु घेण्यासाठी पैसे द्यावे लागणार आहे असं सांगत या इसमाने महिलेकडे ९ लाखांची मागणी केली.

फिर्यादी महिलेने आरोपीने सांगितलेल्या खात्यावर पैसे भरले. एवढी रक्कम भरून देखील वस्तु मिळाल्या नसल्यामुळे महिलेने आरोपीच्या फोनवर आणि सोशल मीडिया अकाऊंटवर अनेक वेळा संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र काही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, महिलेने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.