पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही दीड वर्षांपासून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याने, संतप्त झालेल्या बोपोडीतील महिलांनी सोमवारी महापालिकेवर हंडामोर्चा काढला. एवढेच नाहीतर  पालिकेच्या आवारात रिकाम्या हंड्यानी गरबा खेळून निषेध देखील व्यक्त केला. अखेर  पालिका आयुक्त सौरभराव यांनी महिलांची समस्या समजून घेऊन तातडीने पाण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आले.

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महापालिका प्रशासनाचे नागरी प्रश्नांकडे काहीसे दुर्लक्ष होताना दिसत आहे. मात्र  सणासुदीच्या तोंडावर याचा फटका सामान्यांना बसत आहे.   शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे  प्रकर्षाने दिसत आहेत, तर अनेक भागात पाणीप्रश्न देखील गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी बोपोडीतील महिलांनी थेट महापालिकेवर  हंडा मोर्चा काढला होता.

दसऱ्याचा सण आलेला असताना घरात पाण्याचा थेंबही नसल्याने या महिला प्रचंड संतप्त झाल्या होत्या. बोपोडीतील प्रभाग क्रमांक आठमध्ये पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. अनेक घरांमधील नळांना पाणी देखील येत नाही. तर काही घरांमध्ये पाणी आले तरी अतिशय कमी दाबाने येत आहे. सणासुदीच्या काळातही पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने नागरिकांचे  दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी  व हक्काचे पाणी लवकर मिळावे या मागणीसाठी स्थानिक नगरसेविका सुनिता वाडेकर यांच्या नेतृत्वात जवळपास १०० महिलांनी पालिकेवर हंडा मोर्चा काढला होता. पालिकेच्या आवारातील  महात्मा फुले पुतळ्याजवळ घेर करत रिकाम्या हंड्यानी या आंदोलक महिलांनी गरबा खेळला. यावेळी पालिकेच्या पायऱ्यांवर बसून प्रशासनाविरोधात घोषणा देत पाणी देण्याची मागणी देखील करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते परशुराम वाडेकर, नगरसेवक प्रकाश ढोरे, विजय शेवाळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष अशोक शिरोळे आदींची यावेळी उपस्थित होते.

आयुक्त सौरभ राव यांनी या मोर्चाची दखल घेत सुनिता वाडेकर व शिष्टमंडळाला बोलावून घेतले. त्यांच्याशी चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून याबाबत जाब विचारला. शिवाय एका दिवसात पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. एसएनडीटी व चतुःशृंगी जलकेंद्रातून पाणी देण्याचा, तसेच दोन पम्पिंग करण्याच्या सूचना त्यानी दिल्या. एक-दोन दिवसात पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्यानंतर महिलांनी आपले हंडा गरबा आंदोलन थांबवले.