भक्ती बिसुरे

जम्मू-काश्मीर हा भारताचा अनन्यसाधारण महत्त्वाचा भाग आहे, असे म्हटले जाते. प्रत्यक्षात मात्र तेथील नागरिक आणि इतर राज्यांमधील नागरिकांमध्ये परकेपणा, विसंवाद आणि गैरसमजांची दरी असल्याचे दिसून येते. ही दरी सांधायची असेल, तर दोन्हीकडील नागरिकांच्या मनात परस्परांबद्दल आपलेपणा निर्माण करणे आवश्यक आहे आणि या विचारातून पुण्यातील एका युवतीने आपला खारीचा वाटा उचलण्यास सुरुवात केली आहे.

डॉ. मानसी पवार असे या युवतीने हे काम सुरू केले आहे. मानसी फिजिओथेरपिस्ट आहे. औंध येथील रुग्णालयात ती कार्यरत आहे. आपल्या व्यावसायिक ज्ञानाचा उपयोग काश्मीरमधील नागरिकांना व्हावा, या उद्देशाने तिने महिन्यातून एकदा श्रीनगरमध्ये बाह्य़रुग्णविभाग चालवण्याचे काम सुरू केले आहे. प्राथमिक स्तरावर हे काम विनामोबदला करून तेथील रुग्णांना बरे करण्याचा मानसीचा मानस आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून मानसी श्रीनगर येथे भेट देऊन बाह्य़रुग्ण विभाग चालवत आहे. मानसी सांगते, काश्मीर आणि तेथील लोक यांच्याबद्दल सर्वसामान्य व्यक्तींना जे कुतूहल असते तसे मलाही होते. त्यातून काश्मीरमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांशी संबंध आला. स्थानिक व्यक्तींशी झालेल्या संवादातून काश्मिरी आणि इतरांमध्ये संवाद हवा हे जाणवले. मी फिजिओथेरपिस्ट डॉक्टर आहे म्हणजे नेमके काय हे तेथील लोकांना माहिती नाही. यातच मला प्रश्नाचे उत्तर मिळाले. तेथील डॉक्टरांशी बोलून मी फिजिओथेरपीतून स्थानिक रुग्णांवर उपाय करण्याचा निर्णय घेतला. श्रीनगर येथील एका क्लिनिकमध्ये मी महिन्यातले काही दिवस फिजिओथेरपी विभाग चालवणार आहे. प्राथमिक स्तरावर हे काम विनामूल्य आहे.

श्रीनगर येथील अनुभवाबद्दल विचारले असता मानसी म्हणाली, काम करण्यासाठी श्रीनगरला जाते म्हटले तेव्हा कुटुंबीयांना चिंता वाटली. माझ्या मनातही थोडी धाकधूक होती. प्रत्यक्षात तिथला अनुभव सकारात्मक होता. जवळच्या खेडय़ापाडय़ांतून आलेल्या रुग्णांकडून तेथील वैद्यकीय सेवेचे चित्र गंभीर असल्याचे जाणवले, हे बदलण्यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न होणे आवश्यक आहे.