प्रेमात आणि युध्दात सर्व काही माफ असतं अस म्हटलं जातं. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील मोबाईल चोरट्यांनी प्रेयसीसाठी चोर बनल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दोघांना दरोडा विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. सागर सावळे आणि निलेश भालेराव असे आरोपींची नावे आहे. या दोघांनी प्रेयसीसाठी २६ मोबाईल आणि तीन दुचाकी चोरल्याचे उघड झाले आहे. सागर हा २२ वर्षांचा असून निलेश हा अवघ्या १९ वर्षांचा आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून भोसरी उड्डाण पुलाच्या खाली दुचाकीवरून आलेले अज्ञात मोबाईलवर बोलत पायी चालणाऱ्या व्यक्तींचे मोबाईल हिसकावत असल्याचं समोर आले होते. याची माहिती दरोडा विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी भोसरी उड्डाण पुलाखाली सापळा रचून आरोपींना अटक केली.

आणखी वाचा- पुणे- मित्रासोबत भांडण झालं म्हणून दुचाकी पेटवल्या; घटना सीसीटीव्हीत कैद

आरोपींकडे अधिक चौकशी केली असता दोन्ही आरोपी हे काम प्रेयसींना खूष करण्यासाठी करायचे अशी माहिती समोर आली. दोघेही आरोपी तरुण असून या दोघांचेही प्रेमसंबंध होते. त्यामुळेच आपल्या प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी ते मोबाईल चोरत असल्याची कबुली त्यांनी पोलिसांसमोर दिली आहे.

आणखी वाचा- पुण्यात नराधम पित्याकडून पोटच्या मुलींवर बलात्कार; पत्नीला कळताच केलं असं काही…

दोन्हीही आरोपी आपल्या प्रेयसींना दर थोड्या दिवसांनी नवीन मोबाईल बदलून द्यायचे. प्रेयसीला चोरीतील मोबाईल देऊन त्यांना खुश करण्यासाठी या दोघांनी गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारला होता. दोघेही जण चोरलेले मोबाईल आपल्याला देत असल्याची माहिती  प्रेयसीला नसल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. दोघांकडून दोन लाख ४२ हजार रुपये किंमतीचे २६ मोबाईल आणि तीन दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. या दोघांच्या चौकशीमध्ये एकूण नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.