News Flash

पारधी मुलांच्या आश्रमशाळा वास्तूसाठी पुण्यातील युवकांची धडपड

सांस्कृतिक कार्यक्रमासह वैयक्तिक देणगीद्वारे निधी संकलनामध्ये पुढाकार

‘केअरिंग हँड्स’ संस्थेच्या आश्रमशाळेतील मुलांसमवेत ‘क्रिआर्टिव्ह’ संस्थेचे युवा कलाकार.

पारधी समाजातील अनाथ मुलांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या ‘केअरिंग हँड्स’ संस्थेच्या आश्रमशाळा वास्तूच्या उभारणीसाठी पुण्यातील युवकांनी धडपड सुरू केली आहे. ‘क्रिआर्टिव्ह’ संस्थेच्या माध्यमातून एकत्र आलेल्या युवकांनी ज्येष्ठ साहित्यिक व. पु. काळे आणि पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यावर आधारित ‘वपुल’ या सांस्कृतिक कार्यक्रमासह वैयक्तिक देणगीच्या आवाहनाद्वारे निधी संकलनामध्ये पुढाकार घेतला आहे.

देश स्वतंत्र होऊन सात दशके उलटून गेली तरीही पारधी, भिल्ल आणि भटक्या जाती-जमातींच्या आयुष्यात परिवर्तनाची पहाट उगवलीच नाही. ‘मला काय त्याचे’ हा भाव त्यांच्याबाबतीत आपण जोपासतो. परंतु, आदिवासी आणि भटके हेही आपल्या समाजाचे अविभाज्य घटक असून त्यांना सर्वसमावेशक प्रगती करण्याची संधी देणे हे आपले कर्तव्य आहे, या भावनेतून ‘केअरिंग हँड्स’ संस्थेतर्फे नगरपासून जवळच असलेल्या वाळूज येथील आश्रमशाळेत ८५ अनाथ मुलांच्या निवास-भोजन आणि शिक्षणाचा खर्च उचलून त्यांचे पुनर्वसन केले जाते. शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीमध्ये ही आश्रमशाळा जळून खाक झाली. संस्थेतील ८५ मुलांच्या निवासाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. संस्थेच्या आश्रमशाळेची इमारत उभी राहण्यासाठीच्या कामामध्ये आम्हीही खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करीत आहे, असे क्रिआर्टिव्ह संस्थेचे पराग बापट यांनी सांगितले.

केअरिंग हँड्स संस्थेच्या कार्याचा सुरुवातीपासून साक्षीदार असलेल्या एका अनामिक सेवाभावी दात्याने तळेगाव येथील आपली स्वमालकीची दोन एकर जमीन देणगी दिली आहे. त्या जागेवर इमारत उभी करण्यासाठी सुमारे ६५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. संस्थेच्या या कार्यामध्ये आपलाही वाटा उचलण्याच्या उद्देशातून आम्ही कलाकार मंडळी ‘वपुल’ कार्यक्रमाचे प्रयोग करणार आहोत. या प्रयोगातील तिकिट विक्रीतून मिळणाऱ्या रकमेबरोबरच प्रयोगासाठी आलेल्या रसिकांना संस्थेसाठी देणगी देण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. संस्थेला किमान दहा लाख रुपयांच्या निधीचे संकलन करून देण्याचा संकल्प करण्यात आला आहे, असे बापट यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2020 1:51 am

Web Title: pune youth fight for ashram shala school abn 97
Next Stories
1 पुण्यातील १० करोनाग्रस्तांची प्रकृती स्थिर, विभागीय आयुक्तांची माहिती
2 विदेशातून परतलेल्या नागरिकांवर लक्ष
3 निधी आहे; पण खर्च नाही!
Just Now!
X