चाळीस अंशाच्या आसपास असलेल्या तापमानामुळे उन्हाचा चटका सध्या सगळ्यांना जाणवत आहे आणि त्यामुळे चर्चाही उन्हाचीच आहे. अशा या चटका देणाऱ्या उन्हाळ्यातही बाहेरचे तापमान चाळीस अंशाच्या आसपास असताना घरातील तापमान मात्र वीस अंशाच्या आसपास ठेवण्याचा एक घरगुती प्रयोग पुण्यात यशस्वी झाला आहे. सुखसागरनगरमध्ये राहणाऱ्या उमेश दारवटकर यांनी केलेल्या या अल्प खर्चातील प्रयोगामुळे त्यांच्या घरातील तापमान सध्या पंधरा- वीस ते चोवीस अंश सेल्सियसच्या आसपास रहात आहे.

उन्हाची तीव्रता वाढताच घरोघरी पंखे किंवा वातानुकूलन यंत्रणा किंवा कूलर यांचा वापर मोठय़ा प्रमाणात सुरू होतो. सकाळपासून सायंकाळपर्यंत घराचे छत आणि भिंती तापत असल्यामुळे पंखे वा अन्य यंत्रणा वापरूनही उन्हाळा जाणवत राहतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन उमेश दारवटकर यांनी हा प्रयोग त्यांच्या घराच्या गच्चीवर केला आहे. घराचे छतच अधिक तापणार नाही यासाठी त्यांनी वाया गेलेली पोती आणि थर्माकोलचा वापर करून त्यांच्या घराची गच्ची अच्छादित केली आहे. दारवटकर यांच्या बागेत नारळाची तीन झाडे आहेत. या झाडांच्या फांद्या वापरून त्यांनी ज्या भागातून घरात ऊन येते तेथील भिंतींना या फांद्या उभ्या पद्धतीने लावल्या आहेत. त्यामुळे त्या भिंती तापत नाहीत आणि घरातील तापमान कमी होण्यास मदत होते.

या प्रयोगात घराच्या गच्चीवर प्रथम पोती पसरली. ही पोती ओली रहावीत आणि त्यांचा ओलसरपणा कायम रहावा यासाठी या पोत्यांवर एक ते दीड इंच जाडीचे थर्माकोलचे शीट पसरून टाकले. त्यानंतर गच्चीवर जुने पाईप वगैरे वापरून सात फूट उंचीचा एक मंडप तयार केला.

या मंडपाचे जे आडवे पाईप आहेत त्यांचा आधार घेऊन रबरी नळी फिरवण्यात आली. या नळीला अगदी बारीक अशी छिद्र असून नळीत पाणी सोडले की ते नळीच्या बारीक छिद्रांमधून आधी थर्माकोलवर पडत राहते. त्यातून ते हळूहळू फटींमधून खाली पोत्यांवर पडते आणि पोती ओली होतात. थर्माकोलमुळे पोती सतत ओली राहतात आणि घराचे तापमान बाहेरच्या तापमानापेक्षा पंधरा अंश सेल्सियसने कमी राहते, असा अनुभव दारवटकर यांनी सांगितला. सुखसागरनगरमध्ये सीमासागर सोसायटीत (प्लॉट क्रमांक २३), टेलिफोन एक्सचेंजसमोर दारवटकर यांचा बंगला असून या प्रयोगाबाबत त्यांच्याशी ९६०४७०३२९१ या क्रमांकावर संपर्क साधून अधिक माहिती घेता येईल.

घरातील वाया गेलेल्या किंवा टाकाऊ वस्तूंचा वापर करून वेगवेगळे प्रयोग करून पाहण्याचा दारवटकर यांना छंद आहे. त्यातूनच उन्हाळा सुसह्य़ व्हावा यासाठी काय करता येईल असा विचार त्यांनी केला आणि घराच्या गच्चीवर त्यांनी हा प्रयोग करून बघितला. घरातील आणि थोडे विकत आणलेले साहित्य वापरून स्वत:च्या कल्पनेतून केलेला हा प्रयोग यशस्वी झाल्याचा त्यांचा अनुभव आहे.