संचारबंदी असतानाही घराबाहेर पडलेल्या पुणेकरांना पोलिसांनी इशारा दिला आहे. शहरातील वाहतूक दुपारी तीन नंतर पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे मात्र, यामधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील, असे पुण्याचे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी सांगितले आहे.

यापूर्वी पुणे पोलिसांनी ट्विट करुन याबाबत सुतोवाच केले होते. एका ट्विटला उत्तर देताना आयुक्त व्यंकटेशम यांनी म्हटले होते की, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतूक सेवा बंद ठेवण्यात येतील. नागरी भागात संचारबंदी सुरु असतानाही अनेक वाहने रस्त्यावर आली आहेत. संचारबंदीचा आदेश लोकांनी मनावर न घेतल्यामुळे दुपारपासून वाहनबंदी करण्यात येणार आहे. तत्पूर्वी संध्याकाळपासून वाहतूक थांबवण्यात येणार होती.

दरम्यान, रविवारी पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुणेकरांनी ‘जनता कर्फ्यू’ यशस्वी केला होता. या काळात लोक घराबाहेर पडले नव्हते, त्यामुळे शहरातील सर्व महत्वाचे रस्ते अक्षरशः ओस पडले होते. त्यानंतर रविवारीच दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत पुढे ३१ मार्च पर्यंत संचारबंदी लागू राहिल असे म्हटले होते. त्यानुसार, पुणे पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी रविवारी रात्री संचारबंदीचा आदेश काढला होता. मात्र, याकडे पुणेकरांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.