स्मार्ट सिटी अभियानात नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी नागरिकांकडून सूचना व मते घेण्याचा उपक्रम शहरात सुरू आहे आणि या अभियानात नागरिकांना केंद्रस्थानी मानले गेले आहे. मात्र या अभियानात महापालिकेकडून भरून घेतल्या जात असलेल्या अर्जामध्ये केंद्रस्थानी मानल्या गेलेल्या नागरिकांच्या मताला अवघी एक ओळ देण्यात आली आहे.
स्मार्ट सिटी अभियानात पुणे शहरातील नागरिकांना शहराबद्दल काय वाटते आणि शहरातील कोणत्या तीन मोठय़ा समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे याबद्दल नागरिकांची मते व सूचना गोळा केल्या जात आहेत. त्यासाठी महापालिकेने सुमारे तीन हजार कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असून विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर अर्ज भरून घेण्याची यंत्रणा राबवली जात आहे. महापालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन हे अर्ज भरून घेत आहेत. तसेच अनेक मंडळांनीही अर्ज भरून घेण्याचा उपक्रम सुरू केला आहे. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये आदी ठिकाणीही अर्ज भरून घेतले जात आहेत. शाळांमध्ये विद्यार्थ्यांमार्फत पालकांना अर्ज देण्यात आले असून क्षेत्रीय कार्यालयांमध्येही हे अर्ज भरून देण्यासाठी पेटय़ा ठेवण्यात आल्या आहेत. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद आहे.
हा अर्ज भरून देण्याच्या अभियानात नागरिकांनी उत्साह दाखवला असला, तरी अर्जाच्या नमुन्याबाबत मात्र नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अर्जात नागरिकाचे नाव, जन्म दिनांक, राहात असलेल्या भागाचा पिनकोड क्रमांक, ई मेल आयडी, मोबाईल क्रमांक आदी माहिती भरून घेतली जात आहे. मात्र प्रत्यक्ष ज्या मुद्यांबाबत नागरिकांनी मतप्रदर्शन करायचे आहे त्यासाठी अर्जात अवघ्या एका ओळीची जागा देण्यात आली आहे. पुणे शहर कसे असावे याबाबत आपले मत काय या कल्पनेसाठी एका ओळीची आणि जेमतेम चार शब्द लिहिता येतील एवढीच जागा अर्जात देण्यात आली आहे. तसेच, या शहरामध्ये आपण सध्या कोणत्या तीन मोठय़ा समस्यांना सामोरे जात आहात या बाबतही तीन ओळीत माहिती भरून द्यायची आहे. ही जागा अतिशय अपुरी असल्याची तक्रार अनेक नागरिकांनी केली आहे.

पुणेकर जागरूक असून आपले शहर कसे व्हावे याबाबत आम्ही आमच्या कल्पना सविस्तर मांडू इच्छितो. मात्र नागरिकांना केंद्रस्थानी मानलेल्या या सर्वेक्षणात सर्वात कमी जागा नागरिकांच्या सूचनांसाठी देण्यात आली आहे. नागरिकांना जे काही सुचवायचे आहे, जी भूमिका मांडायची आहे, ज्या समस्यांबाबत बोलायचे आहे त्यासाठी जागाच देण्यात आलेली नाही.
संजय भंडारे (संगणक अभियंता)
कल्याणी बर्वे (सदस्य, पालक शिक्षक संघ)