20 September 2020

News Flash

एका व्यक्तीला तरी व्यवहारज्ञान आहे म्हणायचे.!

शहरातील मेट्रो मार्गालगतच्या बांधकामांना चार एफएसआय देण्यापेक्षा अशी मेट्रो न झालेलीच बरी, अशी रोखठोक भूमिका खासदार वंदना चव्हाण यांनी घेताच त्यांना पाठिंबा देणाऱ्या शेकडो प्रतिक्रिया

| August 8, 2014 03:30 am

शहरातील मेट्रो मार्गालगतच्या बांधकामांना चार एफएसआय देण्यापेक्षा अशी मेट्रो न झालेलीच बरी, अशी रोखठोक भूमिका खासदार वंदना चव्हाण यांनी घेताच त्यांना पाठिंबा देणाऱ्या शेकडो प्रतिक्रिया व्यक्त झाल्या असून अनेक जागरूक पुणेकरांनी या भूमिकेबद्दल चव्हाण यांना धन्यवादही दिले आहेत. चला, एका तरी राजकारणी व्यक्तीला व्यवहारज्ञान आहे म्हणायचे, अशा शब्दात या भूमिकेचे स्वागत करण्यात आले आहे.
शहराच्या वाहतूक सुधारणेसाठी आपल्याला मेट्रो हवी आहे, का चार एफएसआयसाठी मेट्रो हवी आहे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. चार एफएसआय देऊन जर मेट्रो प्रकल्प राबवला जाणार असेल, तर अशी मेट्रो न झालेलीच बरी, ही राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांनी मांडलेली भूमिका गुरुवारी ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केली. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेचे स्वागत करणाऱ्या, तसेच या विषयाच्या अनुषंगाने अन्य पैलू समोर आणणाऱ्या भूमिका पुणेकरांनी मांडल्या असून अनेकांनी ‘लोकसत्ता’कडेही या प्रतिक्रिया कळवल्या आहेत.
धन्यवाद ताई..
चला, एका तरी राजकारणी व्यक्तीला व्यवहारज्ञान आहे म्हणायचे. अतिशय योग्य विचार आहेत. गर्दीमुळे आधीच पेठांमध्ये राहणे मुश्कील झाले आहे. त्यात अजून गर्दीची भर टाकू नका. थँक्स वंदनाताई, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत चव्हाण यांना एका प्रतिक्रियेत धन्यवाद देण्यात आले असून त्यांच्या मताशी सहमत असल्याचेही अनेक नागरिकांनी कळवले आहे. सध्या ज्याला त्याला आपल्या शहरात मेट्रो हवी आहे. पुणे-लोणावळा (तिसरा मार्ग), पुणे-चिंचवड- इंदापूर (महाड), पुणे-नाशिक या मार्गाविषयी कोणी बोलायलाच तयार नाही, हीच खेदाची गोष्ट आहे. गेली पंधरा वर्षे पुणे-कोल्हापूर मार्गावर रोज तीनच रेल्वे गाडय़ा आहेत. त्यात वाढ करून घेणे आम्हाला जमलेले नाही. पुणे-बडोदा, पुणे-हुबळी, पुणे-सावंतवाडी या गाडय़ा रोज धावाव्यात अशीही मागणी होते. त्यासाठी आवाज उठवावा, अशी सूचना सुधीर रानडे यांनी केली आहे.
कौतुक करावेसे वाटते..
वंदनाताई, राष्ट्रवादीमध्ये काही लोक जे शहराकडे आपले साम्राज्य म्हणून पाहात नाहीत अशांपैकी एक असल्याने आपले कौतुक करावेसे वाटते. बाकीचे सारे आपल्या पोळीवर तुपाची धार कशी पडेल याच विवंचनेत, अशीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.
फायदे बिल्डर लॉबीचेच
गर्दी नसली की मग मेट्रो कुणासाठी असा प्रश्न येणार. अगदी बरोबर आहे. एफएसआय वाढवला की मग बिल्डर लॉबी त्याचे फायदे घेणार. घरांच्या किमती वाढणार आणि सामान्य माणूस काही तिथे राहू शकणार नाही. मग मेट्रोमधून कोण प्रवास करणार? असे लोक, की ज्यांच्याकडे आधीच चार चाकी वाहने आहेत, असाही मुद्दा मांडण्यात आला आहेच. शैलेंद्र कुलकर्णी यांनी, आम्ही हेच सांगत होतो. तेच अखेर खरे ठरले. त्यावेळी काही लोक त्याला विकासाला विरोध वगैरे म्हणत होते, अशी आठवण करून दिली आहे.
याला जबाबदार कोण..?
वंदना चव्हाण यांच्या भूमिकेचे स्वागत करतानाच काही नागरिकांनी राष्ट्रवादीवर टीकाही केली आहे. वंदनाताई तुमचे बरोबर आहे; पण या परिस्थितीला तुमचेच पक्षश्रेष्ठी जबाबदार आहेत असे का नाही वाटत तुम्हाला? पुणे बकाल करण्यामागे तुमचाच पक्ष आहे, अशी टीका मंगेश यांनी केली असून, आपले साहेब स्कोडा वापरणार, तुमचे कार्यकर्ते स्कॉर्पियो वापरणार आणि सामान्य माणसाला मेट्रो नाही, वा वा! असा राग प्रसाद यांनी व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2014 3:30 am

Web Title: punekars admires vandana chavans role regarding 4 fsi
Next Stories
1 माळीणमधील ४० पैकी ३७ बाधित कुटुंबांचे प्रथम वारस मिळाले
2 पुरवठय़ाच्या सुधारणेसाठी.. पहाटे ५ ते रात्री १२ पर्यंत सीएनजी पंप सुरू ठेवण्याकडे लक्ष
3 ..नुसत्याच नोंदी, तपास वाऱ्यावर!
Just Now!
X