पुणे : ऑनलाइन पद्धतीने वीजबिल भरण्यात पुणेकर ग्राहकांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. सध्या करोना संसर्गाच्या आपत्तीतही पुणेकरांनी ऑनलाइन वीजबिल भरण्यात आघाडी घेतली आहे. मार्च महिन्यात महावितरणच्या पुणे परिमंडळात राज्यात सर्वाधिक १३ लाख ५० हजार ग्राहकांनी ऑनलाइन पद्धतीने तब्बल २६६.२९ कोटी रुपयांचे वीजबिल महावितरणच्या तिजोरीत जमा केले.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र टाळेबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे महावितरणकडून २३ मार्चपासून वीजबिलांची कागदी छपाई आणि त्याचे वितरणही बंद करण्यात आले आहे. महावितरणकडे मोबाइल क्रमांकाची नोंदणी असलेल्या ग्राहकांना एसएमएसद्वारे वीजबिल पाठविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे महावितरणचे (www.mahadiscom.in संकेतस्थळ आणि मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला वीजबिल पाहता येते. त्यावरून ऑनलाइन पद्धतीने वीजबिल भरता येते. क्रेडीट कार्ड वगळता लघुदाब वर्गवारीतील वीजबिल भरण्यासाठीचे सर्व पर्याय आता नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

ऑनलाइन पद्धतीने वीजबिल भरण्यास पुणेकर ग्राहकांनी सातत्याने आघाडी घेतली आहे. सध्या १४ एप्रिलपर्यंत टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे महावितरणचे वीजबिल भरणा केंद्रही बंद करण्यात आली आहेत.

त्यामुळे वीजबिलाचा भरणा ऑनलाइनच करण्याबाबत सातत्याने आवाहन करण्यात आले होते. त्यालाही पुणेकरांनी उत्तम आणि राज्यात आघाडी घेत प्रतिसाद दिला आहे.

नेटबँकिंगचा अपवाद वगळता वीजबिल ऑनलाइन भरण्यासाठी यापूर्वी ५०० रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्काची आकारणी केली जात होती. मात्र, आता क्रेडीट कार्ड वगळता डेबीट, कॅश कार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ऑनलाइन वीजबिल भरणा नि:शुल्क करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ऑनलाइन वीजबिल भरण्यासाठी ५०० रुपयांच्या मर्यादेत दरमाह ०.२५ टक्क्य़ांची सूट देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांनी ऑनलाइन वीजबिल भरण्याचा पर्याय निवडावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

१२२७ कोटी वीजबिल ऑनलाइन

महावितरणने केलेल्या आवाहनानुसार राज्यातील ७३ लाख २९ हजार वीजग्राहकांनी मार्च महिन्यात घरबसल्या १२२७ कोटी २५ लाख रुपयांच्या वीजबिलाचा ऑनलाइन पद्धतीने भरणा केला आहे. यात सर्वाधिक १३ लाख ५० हजार पुणेकर वीजग्रहकांनी २६६.२९ कोटी रुपये वीजबिल जमा केले आहे. त्यापाठोपाठ भांडूप परिमंडलातील ११ लाख वीज ग्राहकांनी ऑनलाइन वीजबिल जमा केले आहे. त्यानंतर कल्याण (१०.२५ लाख), नाशिक (५.६५ लाख), बारामती (५.६३ लाख), कोल्हापूर (४.२२ लाख), नागपूर (४.५ लाख), जळगाव (३.२५ लाख), औरंगाबाद (२.३० लाख) परिमंडळातील ग्राहकांनी ऑनलाइन वीजबिल जमा केले आहे.