गणेशोत्सवासाठी १२ ऑगस्टनंतर कोकणात जाणाऱ्यांना करोना चाचणी बंधनकारक असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले असले तरी पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी वेगळी भूमिका घेतली. पुण्यातून कोकणात जाणाऱ्या नागरिकांना करोना चाचणी करणे बंधनकारक नसल्याचे राव यांनी म्हटले आहे.

गणेशोत्सवासाठी दरवर्षी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्याच्या विविध ठिकाणांहून नागरिक कोकणात आपल्या मूळ गावी जातात. यंदा करोनामुळे गणेशभक्तांना गावी जाण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. १२ ऑगस्टपूर्वी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी १० दिवस विलगीकरणात राहावे, अशी सूचना राज्य सरकारने जारी केली. मात्र, १२ ऑगस्टनंतर कोकणात जाणाऱ्यांसाठी करोना चाचणी बंधनकारक असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले होते. मात्र, पुण्यातून कोकणात जाणाऱ्यांसाठी करोना चाचणी बंधनकारक नसल्याचे विभागीय आयुक्त राव यांनी सांगितले. यामुळे मुंबई, ठाण्यातून कोकणात जाणाऱ्यांसाठी करोना चाचणी बंधनकारक असताना पुण्यातून कोकणात जाणाऱ्यांना सूट कशी, असा सवाल उपस्थित होत आहे.

गणेशोत्सवासाठी पुण्यातून कोकणात जाणाऱ्या नागरिकांना करोना चाचणी बंधनकारक नाही. मात्र, संबंधित नागरिकांना त्यांच्या भागातील पोलीस यंत्रणेचा परवाना आवश्यक आहे. हा परवाना घेताना गेल्या दोन आठवडय़ांमध्ये करोना संसर्ग न झाल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे.

– सौरभ राव, विभागीय आयुक्त, पुणे

राज्याच्या कु ठल्याही भागातून कोकणात जाण्यासाठी र्निबध लागू करण्यात आले आहेत. १० दिवसांच्या विलगीकरणासाठी विनाचाचणी प्रवासाची मुदत बुधवारी संपली. त्यामुळे गुरुवारपासून मुंबई, ठाण्यासह पुणे, सातारा, कोल्हापूर आदी कुठूनही कोकणात जायचे असल्यास करोना चाचणीचा अहवाल आवश्यक असेल.

– अभय यावलकर, प्रमुख, आपत्ती निवारण विभाग