पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या चारही धरण पट्ट्यात पावसाने चांगल्या प्रकारे हजेरी लावली आहे. यामुळे धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे. हे लक्षात घेता शहराला पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात यावा आणि कोणत्याही प्रकारची कपात होणार नाही, याबाबत काळजी घ्यावी. असे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी पुणे महापालिकेच्या सर्व साधारण सभेत पाणी पुरवठा अधिकारी व्ही. जी. कुलकर्णी यांना दिले आहेत. महापौरांच्या या आदेशामुळे पुणेकर नागरिकांची पाणी कपातीमधून सुटका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे शहराला खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या चार धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र मागिल काळात या चार ही धरणातील पाणीसाठ्याची परिस्थिती लक्षात घेत. महापालिका प्रशासनाने सहा महिन्यांपासून पुणेकरांसाठी पाणी कपातीचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. या पाणी प्रश्नावर शहरातील विविध संघटनांनी पुणे महापालिकेच्या बाहेर आंदोलन देखील केली. तरी देखील पाणी प्रश्नावर तोडगा निघाला नव्हता. यानंतर या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी पुणे महापालिकेच्या सभागृहात सर्व पक्षीय नगरसेवकानी केली. त्यावर महापौर मुक्ता टिळक यानी पाणी पुरवठा अधिकारी व्ही. जी. कुलकर्णी यांना याबाबत खुलासा करण्यास सांगितले होते. यानंतर धरणातील पाणीसाठया बाबत दिलेल्या आकडेवारीवरून महापौरांनी धरणातील पाण्याची सद्यस्थिती लक्षात घेत. पुणेकर नागरिकांना पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा करावा. असे आदेश दिले. शहरातील नागरिकांची पाणी कपातीमधून सुटका होणार असल्याने नागरिकांसाठी ही आनंदाची बाब म्हणावी लागेल.