गुंतवणूकदारांचे पैसे थकवल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यामागे लागलेले शुक्लकाष्ट संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. कर्ज परत न केल्यामुळे डीएसकेंच्या पुण्यातील राहत्या बंगल्याचा सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून लिलाव करण्यात येणार आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून डीएसकेंच्या पुण्यातील सेनापती बापट मार्गावरील बंगल्याचा दि. ८ मार्चला लिलाव होणार आहे. या बंगल्याची बेस प्राईस ६६ कोटी ३९ लाख रुपये ठरवण्यात आली आहे. बँकेकडून या लिलावाची वृत्तपत्रात जाहिरात देण्यात आली आहे. सेनापती बापट रस्त्यावरील चतुःश्रृंगी टेकडी लगत हा बंगला आहे. टेकडीवरील नैसर्गिक धबधबा डीएसकेंच्या या बंगल्यामध्ये येतो.

गुंतवणूकदारांचे २३० कोटी रुपये थकवल्याप्रकरणी डीएसकेंवर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी कोर्टाने जामीन नाकारल्यानंतर त्यांना दिल्लीतून अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडीत येताच ते पाय घसरुन पडल्याने त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.