आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शहरासह जिल्ह्य़ाची अंतिम मतदार यादी जिल्हा निवडणूक शाखेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार शहरासह जिल्ह्य़ातील मतदार संख्या ७६ लाख ८६ हजार ६३६ झाली आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुण्यात ७५ लाख ४८ हजार ९५१ मतदार होते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदारयादीत एक लाख ३७ हजार ६८५ मतदार वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

विधानसभेसाठी यापूर्वीच्या कार्यक्रमानुसार अंतिम मतदार यादी १९ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणार होती. मात्र, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अंतिम यादी प्रसिद्ध करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

दरम्यान, जिल्हा निवडणूक शाखेकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादी अद्ययावत करण्यापूर्वी २०, २१, २७ आणि २८ जुलै या चार दिवशी खास मतदार नोंदणी आणि अर्जातील दुरुस्त्यांसाठी विशेष मोहिमा राबवण्यात आल्या होत्या. जिल्हा निवडणूक शाखेने राबवलेल्या खास मतदार नोंदणी मोहिमांतर्गत प्राप्त झालेल्या अर्जातील नागरिकांची नावे आणि ३० जुलैपर्यंत अर्ज केलेल्या नागरिकांचेच अर्ज शहानिशा करून त्यांची नावे अंतिम मतदार यादीमध्ये समाविष्ट केली आहेत, अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी अंतिम मतदार यादीत ७३ लाख ६९ हजार १४१ मतदार होते. त्यानंतर दोन पुरवणी याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यानुसार शहरासह जिल्ह्य़ातील २१ विधानसभा मतदारसंघांतील मतदारांची संख्या ७५ लाख ४८ हजार ९५१ झाली होती. आता विधानसभेसाठी नव्याने मतदारनोंदणी प्रक्रिया राबवण्यात आल्याने मतदारांची संख्या ७६ लाख ८६ हजार ६३६ एवढी झाली आहे. त्यामुळे एक लाख ३७ हजार ६८५ एवढे मतदार वाढल्याचेमोनिका सिंह यांनी सांगितले. अंतिम मतदार यादीनुसार पुरुष मतदार – ४० लाख १९ हजार ६६४, महिला मतदार – ३६ लाख ६६ हजार ७४४, तृतीयपंथी मतदार – २२८ अशी एकूण मतदार ७६ लाख ८६ हजार ६३६ मतदार संख्या आहे.

मतदार यादीत नाव असे शोधा

http://electoralsearch.in

http://www.ceo.maharashtra.gov.in

http://www.nvsp.in

ही संकेतस्थळे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या संकेतस्थळावर जाऊन, त्यावर मतदाराने आपले नाव, वडील किंवा पतीचे नाव, आडनाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ ही माहिती भरल्यानंतर संबंधित मतदाराचे नाव यादीमध्ये आहे किंवा कसे, हे समजू शकेल. या बरोबरच केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे ‘व्होटर हेल्पलाइन’ नावाचे अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातूनही मतदार यादीतील नावाची माहिती मिळवता येईल. तसेच १९५० या  हेल्पलाइनवर संपर्क साधून मतदारांना माहिती मिळू शकणार आहे.