News Flash

पुण्यासाठी सध्याचा पाणीपुरवठा १५ जुलैपर्यंत कायम राहणार

कालवा समितीच्या बैठकीत पुणे शहरासाठी आता सुरू असलेला पाणीपुरवठा (महिन्याला सव्वा टीएमसी) १५ जुलैपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

| April 3, 2013 02:00 am

पुण्याला पाणी पुरविणाऱ्या धरणांमधील पाण्याचे नियोजन करणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत पुणे शहरासाठी आता सुरू असलेला पाणीपुरवठा (महिन्याला सव्वा टीएमसी) १५ जुलैपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याचबरोबर जिल्ह्य़ातील शेतीसाठी एक आवर्तन तसेच, दौंड व इंदापूर तालुक्यांतील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून तेथील तलाव भरण्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णयही घेण्यात आला.
या बैठकीला पुण्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार गिरीश बापट, माधुरी मिसाळ, विनायक निम्हण, बापू पठारे, चंद्रकांत मोकाटे, भीमराव तापकीर, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी विकास देशमुख, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अविनाश सुर्वे, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व्ही.जी. कुलकर्णी आदी उपस्थित होते. पुण्यातील पाणीकपात आणि दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर या समितीत काय निर्णय घेतला जातो याबाबत उत्सुकता होती. मात्र, बैठकीत पिण्यासाठी व शेतीसाठीही पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
पुण्याला पाणी पुरविणाऱ्या खडकवासला, पानशेत, परसगाव व टेमघर धरणांमध्ये सध्या धरणांमध्ये १०.९८ टीएमसी पाणी शिल्लक आहे. त्यापैकी ०.८५ टीएमसी पाणी बाष्पीभवनाद्वारे उडून जाईल असे गृहीत धरण्यात आले आहे. उरणाऱ्या १०.१३ टीएमसी पाण्यापैकी पुणे शहराला सध्या दिले जाणारे दरमहा सव्वा टीएमसी या प्रमाणे (१५ जुलैपर्यंत) ४.५६ टीएमसी पाणी राखून ठेवण्यात आले आहे. याशिवाय दौंड, इंदापूर शहरे व कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रासाठी अर्धा टीएमसी पाणी दिले जाणार आहे. उरलेल्या पाण्यापैकी उभ्या पिकांसाठी एक आवर्तन दिले जाणार आहे. त्यासाठी ३ टीएमसी पाणी सोडले जाईल. हे आवर्तन २८ मार्चपासून सुरू केले असून, ते ३० एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. उरलेले २ टीएमसी पाणी दौंड, इंदापूर तालुक्यांमधील गावांसाठी पिण्यासाठी दिले जाईल. त्यासाठी कालव्याद्वारे पाणी सोडून तेथील तलाव भरून घेतले जाणार आहेत.
‘जलशुद्धीकरणाचे काम वेगाने करा’
पुण्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शेतीसाठी पुरविण्याचा प्रकल्प पुण्यात उभारला जात आहे. त्याचे काम पूर्ण झाले की जास्त पाणी उपलब्ध होऊन आणखी काही पाणी पुण्यासाठी वापरता येईल. त्यामुळे हा प्रकल्प वेगाने पूर्ण करावा, असा आग्रह आमदार बापट यांनी बैठकीत धरला. ‘पाण्याचे वार्षिक नियोजन आधीच झालेले असते. त्यामुळे त्या नियोजनाप्रमाणेच आताच्या बैठकीपूर्वी शेतीसाठी पाणी सोडणे सुरू करण्यात आले आहे,’ असे मुख्य अभियंता सुर्वे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 2:00 am

Web Title: punes water supply will remain as it is till 15th july
Next Stories
1 स्वमग्नतेवर उपकरणांद्वारे करण्यात येणारे उपचार फायदेशीर
2 पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष बी.कॉमच्या ‘फायनान्शिअल अकाऊंटिंग’ च्या प्रश्नपत्रिकेत चुका
3 महापालिका महोत्सवातील लूट; तक्रारींनंतर खर्च चौपटीने कमी
Just Now!
X