करोना महामारीने जगभरात थैमान घातले असून लाखो नागरिकांनी या आजारामुळे जीव गमावला आहे. पुणे जिल्हा माहिती अधिकारी आणि व्यंगचित्रकार राजेंद्र सरग यांचं आज(दि.३) पहाटेच्या सुमारास करोनामुळे निधन झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्या निधनामुळे प्रशासकीय आणि माध्यम क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांना मागील आठवडयात अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी करोनाची चाचणी केली होती. तो रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. तर त्याच दरम्यान त्यांच्या पत्नीचीही तपासणी करण्यात आली. त्यांच्या पत्नीचा रिपोर्टही बाधित असल्याचा आला. त्यानंतर त्यांनाही ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्याच दरम्यान सरग यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. ते लवकरात लवकर बरे व्हावे, यासाठी डॉक्टर आणि प्रशासनामार्फत सर्वोतपरी प्रयत्न करण्यात आले. मात्र आज पहाटेच्या सुमारास राजेंद्र सरग यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे प्रशासकीय आणि माध्यम क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.